जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: नववर्ष स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोपानिमित्त आयोजिलेल्या पार्टीमध्ये मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या २९७ चालकांची झिंग ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी उतरवली. गेल्या सहा दिवसांमध्ये ७४३ चालकांवर अशी कारवाई झाली. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या १७ हजार ७५ बेशिस्त चालकांवर विविध कलमान्वये कारवाई झाल्याने एका आठवड्यात १७ हजार ८१८ वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी सोमवारी दिली.
मद्यपी वाहन चालकांकडून कोणताही अपघात होऊ नये यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी २६ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये ३६ ब्रेथ ॲनालायझरद्वारे (श्वास विश्लेषक यंत्र) तपासणी मोहीम राबवली. नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहर आयुक्तालयाच्या ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या विभागातील १८ युनिटमार्फत ३१ डिसेंबर रोजी मोक्याच्या ठिकाणी नाकाबंदी केली हाेती. तीन हात नाका, कॅडबरी, माजीवडा जंक्शनसह भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगरातील ८० ठिकाणी नाकाबंदी लावली होती. यासाठी ३६ अधिकारी आणि २६४ अंमलदार, तसेच ७५ वाहतूक मदतनीसांची नेमणूक केली होती.
सरत्या वर्षाच्या अनुषंगाने २६ डिसेंबरपासूनच ड्रंक अँड ड्राइव्ह विरुद्धच्या कारवायांना सुरुवात केली होती. २६ ते ३१ डिसेंबर या कालावधीमध्ये ७४३ तळीरामांवर कारवाई झाली. ३१ डिसेंंबर रोजी रात्री अशा २९७ मद्यपींवर कारवाई झाली. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७ हजार ७५ चालकांवर २६ ते ३१ डिसेंबर दरम्यान कारवाई झाली. ३१ डिसेंबर रोजी २९९ चालकांवर इतर कलमान्वये पोलिसांनी कारवाई केली.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७ हजार ८१८ चालकांवर गेल्या सहा दिवसांमध्ये कारवाई केली. यामध्ये ७४३ मद्यपींचा समावेश आहे. चालकांवर कारवाईबराेबरच नवीन वर्षात वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत तसेच त्यांनी स्वत:बरोबरच कुटुंबाची सुरक्षितता अबाधित राखण्यासाठीही या चालकांचे समुपदेशन करण्यात आले.- डॉ. विनय राठोड, पोलिस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर