ठाणे: शस्त्रांची तस्करी करण्यासाठी आलेल्या रमेश किराडे (२५, रा. बिलाला) आणि मुन्ना अमाशा अलवे (३४, रा. बारेला) या मध्यप्रदेशातील दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाने अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मंगळवारी दिली. त्यांच्याकडून १७ पिस्टल, ३१ मॅग्झीन आणि १२ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. दोघांनाही १० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
मागील काही महिन्यांपासून ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरामध्ये अवैध अग्नीशस्त्रांचा गुन्हेगारी कारवायांसाठी वापर होत असून अशा कारवायांना आळा घालण्याचे आदेश सह पाेलीस आयुक्त दतात्रय कराळे आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाब उगले यांनी दिले होते. दरम्यान, अशाच प्रकारची अग्निशस्त्रे मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश भागातून विक्रीसाठी महाराष्ट्रात येत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यांच्यापैकीच दोघेजण शस्त्र तस्करीसाठी ठाण्यात येत असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे शोध पथकाला एका खबर्याकडून मिळाली.
याच पार्श्वभूमीवर मलकापूर ते सीएसटी जाणार्या रेल्वेतून उतरलेल्या रमेश आणि मुन्ना या दोघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद रावराणे, सहायक पोलीस निरीक्षक महेश जाधव, उपनिरीक्षक स्वप्निल प्रधान, अंमलदार प्रशांत भुर्के, राजाराम शेगर, किशोर भामरे, अर्जुन करळे आणि संदीप भालेराव आदींच्या पथकाने सापळा रचून १ जून रोजी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे तीन पिस्टल, सहा मॅग्झीन आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत झाली. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सखोल चौकशीत या दुकलीकडून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सिमेवरील बुलढाणा जिल्हयातील पाचोरी टुनकी भागातून स्थानिक पोलीसांच्या मदतीने देशी बनावटीचे आणखी १४ पिस्टल,२५ मॅग्झीन आणि आठ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. अशाप्रकारे मालमत्ता गुन्हे शाखेने १७ पिस्टल, ३१ मॅग्झीनसह सुमारे सात लाखांची शस्त्रसामुग्री हस्तगत केली.
एका पिस्टलची ३५ हजारांमध्ये विक्री-रमेश आणि मुन्ना हे दोघेजण पिस्टल विक्रीसाठी गिऱ्हाईकाच्या शोधात असतांनाच ठाणे पाे िलसांनी त्यांना हेरले. ३५ हजारांमध्ये एक अशा एक लाख पाच हजारांमध्ये ते या तीन पिस्टलची ते आधी विक्री करणार होते. मात्र, त्याआधीच ते पकडले गेले. त्यांचे आणखी साथीदार कोण आहेत, याचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.