ठाणे : नवी मुंबईतील हॉटेलमध्ये मद्यविक्रीचा परवाना मिळविण्यासाठी वयाची खोटी माहिती दिल्याचा गुन्हा दाखल असलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) मुंबईचे वादग्रस्त माजी संचालक समीर वानखेडे यांना येत्या बुधवारी कोपरी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस ठाणे पोलिसांनी बजावली आहे. शासनाकडे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी ४१- ब नुसार ही नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईच्या क्रूझवरील कथित रेव्ह पार्टी कारवाईनंतर अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर वानखेडे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले. वानखेडे यांचे नवी मुंबईतील वाशी येथे सद्गुरु बार आणि रेस्टॉरंट आहे. या बारचा परवाना १९९७ मध्ये त्यांनी काढला होता. त्यावेळी त्यांचे वय अवघे १७ वर्ष होते. हीच माहिती त्यांनी परवाना मिळविताना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे लपविल्याचा आरोप आहे. याच बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आदेश दिले होते. याच संदर्भात उत्पादन शुल्क विभागाच्या नवी मुंबईतील अधिकाऱ्यांनी १९ फेब्रुवारी २०२२ रोजी शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा कोपरी पोलीस ठाण्यात दाखल केला. याच्या चौकशीसाठी २३ फेब्रुवारी रोजी वानखेडे यांना कोपरी पोलीस ठाण्यात सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याचे आदेश ठाणे पोलिसांनी नोटिसीद्वारे दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.