ठाणे : ठाण्यात पकडलेला मेफेड्रॉन (एमडी पावडर) हा अमली पदार्थ नाशिकात नेला जाणार होता. त्याचबरोबर, तपासात या अमली पदार्थाचे मध्य प्रदेश कनेक्शन पुढे आले आहे. या प्रकरणात पुढे आलेल्या भोला नावाच्या तस्कराचा शोध सुरू असून अधिक तपासासाठी ठाणे गुन्हे शाखेचे वागळे इस्टेट युनिट-५ चे पथक मध्य प्रदेशला रवाना झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.नाशिकमध्ये घरफोडी, चोरी, जबरी चोरी असे विविध १५ गुन्हे दाखल असलेला तसेच मोक्कांतर्गत कारवाईत फरार असलेला अक्रम अस्लम खान (३०) याला ३ जानेवारी रोजी वागळे इस्टेट युनिट-५ ने ठाण्यातील नितीन चौकी येथून एमडी पावडर नेताना पकडले. या वेळी त्यांच्याकडून ८२२ ग्रॅम वजनाची एमडी पावडर जप्त केली. त्याची किंमत १६ लाख ४४ हजार आहे. चौकशीत, त्याला अमली पदार्थ इंदूर येथील रईस शेख आणि अजय जाधवन यांनी दिल्याची माहिती पुढे आल्यावर ठाणे पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. त्यांच्या चौकशीत हे अमली पदार्थ मध्य प्रदेशातील भोला नावाच्या व्यक्तीकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार, मध्य प्रदेशातून एमडी आणल्याचे उघडकीस आले. त्यामुळे हे मध्य प्रदेश कनेक्शन असल्याचे पुढे आले आहे.ठाणे पोलिसांचे सहा जणांचे पथक मध्य प्रदेशला शनिवारी रात्री रवाना झाले. हे पथक मध्य प्रदेशातील बैतुल येथील या प्रकरणात नाव पुढे आलेल्या भोला नावाच्या व्यक्तीचा शोध घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एमडी प्रकरणाचे मध्य प्रदेशात धागेदोरे, ठाणे पोलिसांचे पथक रवाना : तस्कराचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 3:18 AM