ठाणे : मागील आठवड्यातच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे अत्याधुनिक तंत्रज्ञानांने बुजविल्यानंतर पाऊस पडल्याने पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे आता ते बुजवून कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कापूरबावडी उड्डाणपुलावरील खड्डे पॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर करून बुजविण्यात आले. आता हे तंत्रज्ञान पाऊस कितपत टिकविणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.मागील काही दिवस ठाण्यात झालेल्या जोरदार पावसाने शहरातील विविध भागात रस्त्यांना खड्डे पडले होते. त्यांच्या विरोधात आंदोलनेदेखील झाली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी स्वत: रस्त्यावर उतरून ते बुजविले होते. यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. तसेच आयुक्त संजीव जयस्वाल हेदेखील रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या मार्फत सुद्धा खड्यांची डागडुजी करण्यात आली होती. भर पावसात ते बुजविणे शक्य नसल्यामुळे पेव्हर ब्लॉक आणि बांधकाम साहित्याद्वारे ते बुजविण्यात आले होते. मात्र, पावसामध्ये बांधकाम साहित्य वाहून गेल्याने त्याचठिकाणी पुन्हा खड्डे दिसू लागले आहेत.पावसाळ्यात बुजविलेले खड्डे पुन्हा उखडू नयेत म्हणून नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. गेल्या आठवड्यातमहापालिकेने मुंब्रा भागात अॅक्वा पॅच या नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ते बुजविले होते. तर कोपरी पूल येथे रेनकॉनच्या साहाय्याने आणि कॅसल मिल परिसरात पॉलिमर सिरॅमिक काँक्रि टच्या साहाय्याने ते बुजविले होते. त्यापाठोपाठ सोमवारी कापूरबावडी उड्डाणपुलावर पॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर करून ते बुजविण्यात आले. या कामाची पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापालिकेचे शहर अभियंता अनिल पाटील आणि रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी या सर्वांनी पाहाणी केली. या पुलापाठोपाठ आता मंगळवारी शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील खड्डे पॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर करून बुजविले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
खड्डे बुजविण्यासाठी ठाण्यात पॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 2:51 AM