ठाणे - एकीकडे ठाणे शहरात यंदा हवेच्या प्रदुषणात घट झाल्याचा दावा पालिकेच्या प्रदुषण विभागाने केला आहे. परंतु दुसरीकडे ठाण्यावर वाहनांचा भार हा चांगलाच वाढला असल्याची माहिती समोर आली आहे. आज ठाणे शहराची लोकसंख्या ही २२ लाखांच्या घरात गेली आहे. तर वाहनांची संख्या ही लोकसंख्येच्या वेगाने वाढत असून आजच्या घडीला २० लाख ४५ हजार १२३ वाहने रस्त्यावर धावत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामध्ये दुचाकी वाहनांची संख्या ही सर्वाधिक असल्याचेही स्पष्ट झाले आहे. याच आकडेवारीवरुन ठाणे शहरात दर तासाला तब्बल १२ वाहने खरेदी केली जात असल्याची बाबही समोर आली आहे. ठाणे महापालिकेच्या प्रदुषण विभागाने प्रसिध्द केलेल्या पर्यावरण अहवालातून या बाबी समोर आल्या आहेत. ठाण्यातील मुख्य रस्ते हे मोठे आहेत. परंतु आज त्या रस्त्यांच्या ठिकाणी मेट्रो आणि इतर कामे सुरु झाल्याने त्या ठिकाणी कोंडी होऊ लागली आहे. तसेच वाहतुक कोंडी फोडण्यासाठी शहराच्या विविध भागात उड्डाणपुल उभारण्यात आल्या आहेत. घोडबंदर पट्यात तर ४ -४ पदरी रस्ते असतांनासुध्दा या मार्गावर आजही कोंडी होतांना दिसत आहे. त्यात शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या बाबतीत बोलायचेच झाले तर स्टेशन परिसर, जांभली नाका, कोर्टनाका, गोखले रोड, नौपाडा, मल्हार, सिव्हील रुग्णालय आदींसह इतर रस्त्यांवर तर वाहन चालकांची वाहन चालविण्यासाठी कसरत सुरु असते.दरम्यान प्रदुषण विभागाने दिलेल्या अहवालानुसार ठाणे शहराची लोकसंख्या ही सुमारे २२ लाखांच्या घरात आहे. तर वाहनांची संख्या ही २० लाख ४५ हजार १२३ एवढी आहे. दरवर्षी वाहनांच्या संख्येत ८ ते १० टक्यांची वाढ होत असल्याचेही या विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे भविष्यात शहराच्या लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्या आल्यास आर्श्चय वाटण्यासारखे काहीच नसेल. २०१६-१७ या वर्षात वाहनांची संख्या ही १९ लाख २७ हजार १५५ एवढी होती. यंदा मात्र त्यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.तर २०१८-१९ या वर्षात शहरातील वाहनांची संख्या ही २० लाख ४५ हजार १२३ एवढी असून त्यामध्ये दुचाकींची संख्या ही सर्वाधीक असल्याची बाबही समोर आली आहे. ज्यामध्ये दुचाकींची संख्या ही १०७६५६४ एवढी आहे. तर ४१४२८४ एवढी कारची संख्या असून ४५४१४ जीप संख्या आहे. याशिवाय १०६४८७ रिक्षा या ठाणे शहरात धावत असून, ३७४६१ टुरुस्टी कॅब, १२५९ स्कुल बस, ४७२ टी एम टी बस, ७७५०४ ट्रक, ८९३४ ट्रेलर, ११६४० टँकर आणि १७५१ अॅम्ब्युलन्स रस्त्यावर धावत आहेत. ठाणे शहराच्या लोकसंख्येच्या आसपास आता वाहनांची संख्या आलेली आहे. तर वाहतुक विभागाने दिलेल्या माहितीनुसार एका वर्षापूर्वी ठाणे शहरात एका नागरीकामागे वाहनांची संख्या ही दोन होती. परंतु आता वाहनांची संख्या ज्या पध्दतीने वाढत आहे. त्यामुळे वाहतुक कोंडी आणखी कठीण होणार आहे.