ठाणे: एस. टी.मध्ये गहाळ झालेल्या वस्तू प्रामाणिकपणे प्रवाशांना परत देणाऱ्या एस. टी. चालकाचाच मोबाईल फोन ठाण्यात गहाळ झाला. यावेळी काही प्रवाशांच्या तत्परतेला काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मिळालेल्या साथीने तो बळकावू पाहणाऱ्या रिक्षाचालकाचा डाव उधळून तो पुन्हा मूळ मालक असलेले ठाणे- पुणे एसटीचे चालक गौतम कांबळे यांना परत करण्यात यश आले. हा प्रकार बुधवारी घडला असून, मोबाईल परत मिळाल्यावर नेहमी प्रवाशांचा एस. टी.मध्ये हरवलेल्या वस्तू देताना फोटो काढतात, त्याचप्रमाणे एसटी चालक कांबळे यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत एक फोटो काढून त्यांचे आभार मानले.
नौपाडा परिसरात काही जण रिक्षाचालकासोबत वाद घालत होते. त्यातील एका ओळखीच्या व्यक्तीने ठाणे शहर काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांना आवाज दिला. आवाज ऐकून ते काय प्रकार चालू आहे हे जाणून घेण्यासाठी तेथे गेले. त्यावेळी मोबाईलवरून तेथे वाद सुरू असल्याचे त्यांच्यासमोर आले. तो माझा फोन आहे, असे रिक्षाचालक सांगत होता, तर ते प्रवासी तो फोन रिक्षाचालकाचा नसल्याचे सांगत होते. याचदरम्यान, पिंगळे यांनी काही प्रश्न रिक्षाचालकाला विचारले असता त्याला मोबाईची ओळख पटवून देता आली नाही. त्यातच त्याने तिथून हळूच पळ काढला. त्यानंतर थोड्याच वेळात त्या मोबाईलवर फोन आला. मी एसटीचालक गौतम कांबळे बोलतोय. तो माझा मोबाईल आहे. आपण कुठे आहात, मी कुठे येऊन घेऊ, अशी विचारणा केली. त्यावेळी पिंगळे त्यांनी तुम्ही कुठेही येऊ नका आम्ही मोबाईल घेऊन वंदना एस. टी. स्टँडला येतो, असे सांगितले. तत्पूर्वीच चालक कांबळे हे एस. टी. प्रवाशांना घेऊन तेथे पोहोचले होते. मोबाईल पाहताच कांबळे यांना खूप आनंद झाला. यावेळी पिंगळे यांच्यासोबत सुशील वाघुले, दीपक नरे, संजय गौड हे काँग्रेस पदाधिकारी व प्रवासी होते.
"एस. टी. कर्मचारी हसतमुख, तुटपुंजा पगारातही प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. त्यामुळे ते खरे कोरोना योद्धे आहेत. कोरोनाच्या कठीण काळात जीवाची पर्वा न करता डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांची वाहतूक केली. एस. टी. कर्मचारी प्रवाशांना दैवत समजून करत असलेल्या सेवेचा सार्थ अभिमान आहे. अशातच मिळालेला मोबाईल कांबळे यांना परत करण्याची संधी मिळाली."
- राहुल पिंगळे, अध्यक्ष, ओबीसी विभाग, ठाणे.