ठाणे : ठाणे लोहमार्ग पोलिसांची मंजूर असलेल्या मनुष्यबळापेक्षा सध्याचे मनुष्यबळ कमी आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान मिळालेले होमगार्डही कमी झाले आहेत. या सर्व परिस्थितीत लोहमार्ग पोलीस आयुक्तालय जुन्या गुन्ह्यांची लेखी माहिती मागवत असल्यामुळे लोहमार्ग पोलीस हैराण झाले आहेत. मनुष्यबळ नसल्यामुळे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे वाढण्याची भीती पोलीस व्यक्त करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.लोहमार्ग पोलिसांची हद्द मध्य रेल्वेवर ठाणे कोपरी ते कोपर या आठ किमीपर्यंत, तसेच दिवा येथून कळंबोली अशी ४० किमी अशी आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या गर्दीच्या रेल्वे स्थानकांत मोबाइलचोरी, पाकीटचोरीच्या घटना नेहमीच घडत आहेत. २०१७ मध्ये मोबाइलचोरीप्रकरणी एफआयआर दाखल होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर वषर्भरात साधारणत: तीन ते साडेतीन हजार गुन्हे नोंदवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलीस साध्या वेशात लोकलच्या डब्यात पहारा ठेवत आहेत. तसेच टॉप २५ मोबाइल चोरट्यांची यादीही अद्ययावत केली असून पेट्रोलिंगही वाढवली आहे.ठाणे रेल्वे स्थानकात दिवसेंदिवस प्रवासी संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांच्या मदतीला १५० होमगार्ड आणि २५ मुंबई सुरक्षा बोर्डाचे अतिरिक्त मनुष्यबळ मिळाले आहे. तसेच, ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याला २०२ कर्मचारी संख्या मंजूर असून सध्या १७२ जणांचेच मनुष्यबळ आहे. अतिरिक्त मनुष्यबळामुळे लोहमार्ग पोलिसांचा गुन्हेगारांवर चांगला वचक बसला होता. त्यामुळे स्थानक परिसरातील गुन्हे काही प्रमाणात कमी झाले होते. होमगार्ड स्थानकात पहाटे व रात्री एक्स्प्रेस गाड्या आल्यावर गुन्हे घडणार नाहीत, याची काळजी घेतली जात होती. मात्र, प्रशिक्षणाचे कारण देत १०० होमगार्ड अचानक कमी करण्यात आले. त्यानंतर केवळ ५०-५७ होमगार्डच उरले आहेत. त्यातच सहायक आयुक्त, उपायुक्त कार्यालयांकडून जुन्या गुन्ह्यांतील आरोपींची माहिती मागवत असल्याने काम वाढले आहे.
ठाणे लोहमार्ग पोलिसांना हवे मनुष्यबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 2:23 AM