ठाणे : ठाण्यात दहशतवादी हल्ला झाल्यास त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी पोलिस दल सक्षम आहे. शहरी अथवा रेल्वेपोलिस नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमच दक्ष असतात. महाराष्ट्र पोलिस दल 'वर्धापन दिन' निमित्त ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सायबर गुन्हे व त्यामुळे घ्यावयाची दक्षता यासंदर्भात बाल पथनाट्य, शाळेतील विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यात चालणारे कामकाज, अत्याधुनिक शस्त्राची माहिती गुरुवारी ठाणे रेल्वे पाेलिसांनी दिली.
कायदा सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर कायमच असते. कधी कोणती घटना होईल, हे सांगता येत नाही. मात्र, अशी परिस्थिती सावधपणे हाताळावी लागते. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांचे कर्तृत्व सर्वांनी अनुभवले. सामान्यत: पोलिस कोणत्या परिस्थितीमध्ये काम करतात याची सर्वांनाच माहिती नसते. मात्र, रेल्वे पोलिसांचे काम कसे चालते याचा अनुभव ठाण्यातील विद्यार्थ्यांनी घेतला. ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंढरी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिन "रेझिग डे" निमित्त पोलिस विभागात सद्या वापरत असलेल्या अत्याधुनिक शस्त्रांचीही माहिती देण्यात आली.
सायबर क्राईमचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहणे, किती महत्त्वाचे असते, याची माहिती देणारे पथनाट्य ठाणे स्थानकात प्रवाशांनी अनुभवले. सोशल मीडिया शाप की वरदान' त्यामुळे होणारे सायबर गुन्हे, तसेच त्यापासून कशी दक्षता घ्यायची या संदर्भात सेवा सहयोग फाउंडेशन ठाणे यांच्याकडून बाल कलाकारांकडून जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. पोलिस निरीक्षक एस. जी. खंदारे, पोलिस हवालदार डी. एस. पारधी, प्रशांत नागारपोले, आदींनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.