- पंकज रोडेकर ठाणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात ‘महिलाराज’ पाहण्यास मिळणार आहे. या पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व जबाबदाºया उद्या दिवसभर ४६ जणी समर्थपणे बजावताना दिसणार आहेत.या साऱ्यांनी दिवस व रात्र अशा दोन्ही शिफ्टमधील कामे वाटून घेतली आहेत. त्यामध्ये पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदारापासून गुन्ह्याचे एफआयआर नोंदणे, तपास आदी कामांचा समावेश आहे. त्यांचे पुरुष सहकारी हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसभर कार्यरत राहून त्यांना सहकार्य करणार असल्याची महिती सूत्रांनी दिली.शासकीय नोकरीमध्ये ३० टक्के महिलांना आरक्षण मिळाले आहे. मात्र, महिला दिनानिमित्त वरिष्ठ अधिकाºयांच्या आदेशानुसार, ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या (प्रभारी) वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी हा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. ढाकणे यांच्यासह चार पोलीस हवालदार, पाच पोलीस नाईक आणि उर्वरित पोलीस शिपाई अशा ४६ जणी सद्य:स्थितीत लोहमार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. एरव्ही, ड्युटी लावण्यापासून गुन्ह्यांचा तपास आणि गुन्ह्यातील मुद्देमालांबाबतची कामे, गुन्ह्याचा पंचनामा आदी कामे महिला पोलीस करत असतात. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याची हद्द सीएसएमटी ते कल्याण या मार्गावर कोपरी ते दिवा आणि कोकण रेल्वेमार्गावर दिवा ते क ळंबोली अशी असून लोकल प्रवासात मोबाइलचोरीचे प्रमाण अधिक आहे. मात्र, उद्या ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे संपूर्ण नियंत्रण केवळ महिलांच्याच हाती असेल. त्यामुळे ही आव्हानात्मक जबाबदारी पेलण्याकरिता या लोहमार्ग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस सिद्ध झाल्या आहेत. आतापर्यंत महिलांशी संबंधित गुन्ह्यांचा तपासाकरिता चार महिला पोलीस हवालदार तर मोबाइल, पाकीट व इतर चोरीच्या गुन्ह्यांचा तपास पाच महिला नाईक यांच्याकडे दिला जात असून त्यांच्याकडून त्या गुन्ह्यांचा व्यवस्थित तपास केला जात असल्याने उद्या ही सुवर्णसंधी महिला पोलिसांना लाभल्याची माहिती सूत्रांनी दिली.>‘‘महिलांनी गुन्ह्यांची उकल करण्याकरिता पुढे यावे, यासाठी वरिष्ठ अधिकाºयांनी दिलेल्या आदेशानुसार, हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर पोलीस ठाण्यात अंमलदारापासून पोलीस ठाण्यातील विविध कामांची सूत्रे महिला पोलिसांच्या हाती दिली जाणार आहेत. पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिलांना दिवस आणि रात्र अशा शिफटमध्ये कामे वाटण्यात आली आहेत.’’- स्मिता ढाकणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (प्रभारी), लोहमार्ग पोलीस ठाणे
ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात आज ‘महिलाराज’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 12:44 AM