ठाणे - काही दिवसांची उसंत घेतल्यानंतर शुक्रवारपासून पावसाने ठाण्यात दमदार हजेरी लावली. परंतु मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाला आहे. पुढील काही दिवस असाच पाऊस कोसळला तर मागील वर्षीचे ठाण्यातील पावसाचे रेकॉर्ड तुटेल. आतापर्यंत ठाण्यात एकूण ३०१५.९१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी चार महिन्यात ४५६९.९१ मि.मी. पाऊस झाला होता. ठाण्यात शुक्रवारपासून पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. शनिवारी सकाळ पासून जोरदार सरी बरसत आहेत.दिवसभरात ठाण्यात ५०.४०मि.मी. पाऊस झाला. मागील वर्षी याच दिवसापर्यंत ठाण्यात ३०५७.९१ मि.मी. पाऊस झाला होता. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यातही तुफान पाऊस झाल्याने तब्बल ४५६९.९१ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यंदा आतापर्यंत झालेल्या पर्जन्यमानाचा विचार करता गतवर्षी एवढा पाऊस होण्याकरिता अद्याप १५५४ मि.मी. पाऊस होणे बाकी आहे. पुढील काही दिवस असाच पाऊस झाला तर गतवर्षीचा पावसाचा रेकॉर्ड यंदा पुन्हा साध्य केला जाऊ शकेल. मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे.कल्याण-डोंबिवलीत रिपरिप सुरूचडोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिसरात शुक्रवारपासून संततधार पडत असलेल्या पावसाने शनिवारीही दिवसभर हजेरी लावली होती. आकाश पूर्णत: ढगाळलेले होते. अधूनमधून पडणाऱ्या लहानमोठ्या सरींनी कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांच्या नियोजनावर सपशेल पाणी फिरवले. मोठ्या सरींमुळे काही वेळ सखल भागांमध्ये पाणी साचले होते. परंतु, पावसाचा जोर कमी होताच हे पाणी ओसरत होते. त्यामुळे कुठेही रहिवाशांची गैरसोय झाली नाही. कल्याण-शीळ रस्त्यावर सकाळी व सायंकाळी वाहतूककोंडी झाली होती. कल्याण-आग्रा रस्त्यावरही लालचौकीदरम्यान वाहतूक संथगतीने सुरू होती.
ठाण्यात पावसाचा विक्रम मोडण्याकरिता सप्टेंबर चिंब हवा, गतवर्षी झाला होता दशकातील सर्वाधिक पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 1:33 AM