ठाणे : वाढीव वीजबिले आणि महावितरणच्या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना आता सरकारी कार्यालयेही यातून सुटलेली नाहीत. ठाणे शिधावाटप कार्यालयाने थकीत वीजबिल न भरल्यामुळे या कार्यालयाची वीज महावितरणने खंडित केली आहे. परिणामी गेले चार दिवस हे कार्यालय अंधारात आहे. मेणबत्ती लावून किंवा मोबाइलच्या लाइटच्या प्रकाशात येथील कर्मचारी नागरिकांची कामे करत आहेत.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शिधावाटप कार्यालय आहे. तेथे दैनंदिन कामांसाठी मोठ्या संख्येने नागरिक दररोज येतात. मात्र चार दिवसांपासून या कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने कार्यालयाचे सर्व काम हे अंधारातच सुरू आहे. या कार्यालयाला ९६ हजार रुपयांचे वीजबिल महावितरणने पाठवले होते. यापकी ४१ ‘फ’ या कार्यालयाने ४१ हजारांचे बिल भरले आहे, अशी माहिती या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, याच कार्यालयाच्या बाजूला असलेल्या कार्यालयाने बिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित केला असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे. हे बिल भरण्यासाठी त्यांना सात दिवसांची मुदत दिली होती. मात्र त्यांनी वेळेत बिल न भरल्याने अखेर महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला, मात्र याचा नाहक भुर्दंड बाजूच्या कार्यालयाला सहन करावा लागत असून त्यांना चार दिवसांपासून अंधारात काम करावे लागत आहे.
-------------
अधिकाऱ्यांमुळे थकले कार्यालयाचे बिल
वीजबिल थकण्यामागे याच कार्यालयातील अधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभार उघडकीस आला आहे. यामुळे या कार्यालयातील सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना मात्र नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी वीजबिले मुख्य कार्यालयाकडे पाठवलेली नाहीत. वेळेत महिन्याचे बिल दिले असते तर थकबाकी झालीच नसती, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
-------------
संबंधित अधिकाऱ्यांनी फेब्रुवारीपासूनची बिले आमच्याकडे पाठवलीच नसल्याने हा सर्व घोळ झाला आहे. बिले वेळीच पाठवली असती तर ही थकबाकी झालीच नसती. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना करणे दाखवा नोटीस पाठवली असून खंडित केलेला वीजपुरवठा बुधवारीच पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- नरेश वंजारी, उपनियंत्रक, शिधावाटप कार्यालय
--------------