ठाणे : मालेगावहून मुंबईतील जे.जे. रुग्णालयात रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला धडकून उलटली. हा अपघात ठाण्यातील आनंदनगर जकातनाक्याजवळ रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडला. त्यात रुग्णवाहिकेतील रुग्णासह सहा जण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारार्थ मुंबईतील राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णवाहिकेच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने किंवा एखाद्यावेळी डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.मालेगाव येथील इस्लामपूर येथे राहणाऱ्या मोहम्मद मोमीन (१८) यांची आत्या संकिला हिच्यावर मागील काही दिवसांपासून मालेगाव शासकीय (सिव्हिल) रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी अचानक त्यांचीप्रकृती जास्त झाल्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलवण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला. त्यानुसार, मोहम्मद हे आपल्या नातेवाइकांसह आत्याला घेऊन रुग्णवाहिकेने मुंबईकडे निघाले होते. रुग्णवाहिका ठाण्यातील आनंदनगर जकातनाक्याजवळ आल्यावर ती रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला धडकून उलटली. अपघातात रुग्णवाहिकेत असलेल्या मोहम्मद यांच्यासह त्यांची आत्या,तिचे पती मुस्ताक, आजी खलिदा (६५), काका अखिल अहमद रशीद (३५) आणि चालक शकुर बेग (३५) असे सहा जण जखमी झाले. ते सर्व जण इस्लामपूर येथील रहिवासी आहेत. त्या सर्व जखमींसह त्याच्या आत्याला तातडीने मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले आहे. याप्रकरणी मोहम्मद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाच्या निष्काळजीमुळे हा अपघात घडल्याचे तक्रारीतनमूद असल्याची माहिती कोपरी पोलिसांनी दिली.
ठाण्यात रुग्णवाहिका उलटून रुग्णासह सहा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 5:41 AM