ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून वाचनप्रेमींसाठी निर्सग वाचनालय, महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘वाचनाचा कोपरा’ हे उपक्रम आकाराला येत असतानाच 'चला वाचूया' या मोहिमेत आणखी एक नवीन प्रयोग करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात दुसऱ्या मजल्यावरील आयुक्त कार्यालयाबाहेर छोटेखानी वाचनालय तयार करण्यात आले आहे. या वाचनालयात मराठी आणि इंग्रजी भाषेतील उत्तमोत्तम पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खंडात्मक चरित्र, ययाती, कोसला, रणांगण, फकिरा या सारख्या कादंबऱ्या, खरेखुरे आयडॉल्स, व्यक्ती आणि वल्ली, नापास मुलांची गोष्ट, बनगरवाडी यांच्यासह नटसम्राट, अग्रिपंख, प्रकाशवाटा, एक होता कार्व्हर आदी पुस्तके या वाचनालयात आहेत. त्यांच्या जोडीला, सेपिअन्स, ब्लॅक स्वॅन, इलॉन मस्क, इकेगाई आदी इंग्रजी पुस्तकेही येथे वाचनासाठी उपलब्ध आहेत. या वाचनालयाला वाचकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. आयुक्त कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांसाठी असलेल्या प्रतिक्षालयात हे वाचनालय सुरू करण्यात आले आहे. या प्रतिक्षालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनी या वाचनालयाचा लाभ घ्यावा. इथे बसून सगळे पुस्तक वाचून होणार नाही, मात्र त्या पुस्तकांची ओळख होईल आणि मग त्यातून ते पुस्तक मिळवून संपूर्ण वाचण्याची ओढ लागू शकेल, असा विचार हे वाचनालय सुरू करण्यामागे असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले. मोबाईलच्या छोट्या स्क्रीनने आपले दैनंदिन आयुष्य पूर्णपणे व्यापले आहे. मात्र तरीही छापील वर्तमानपत्र, पुस्तक वाचण्याची आपल्यात असलेली नैसर्गिक उर्मी आजही कायम आहे. त्याला सकारात्मक उर्जा देण्यासाठी समोर पुस्तके, वर्तमानपत्रे उपलब्ध असली पाहिजेत. या प्रतिक्षालयात जो काही वेळ लागतो तो वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरावा, अशी या वाचनालयामागची प्रेरणा आहे, असेही बांगर यांनी स्पष्ट केले.वाचनाने व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल घडून येतो. ज्यांच्या वाचनाशी, पुस्तकांशी संपर्क येतो त्या व्यक्तींमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्यासोबतच विचार करण्याच्या क्षमतेचा विस्तारही झालेला दिसतो. शिवाय, वाचनाची मैत्री ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर होऊ शकते, असेही बांगर म्हणाले.
अच्युत पालव यांच्या सुलेखनाने सजल्या भिंतीया वाचनालयाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, प्रतिक्षालयाच्या भिंतींवर, आंतरराष्ट्रीय ख्याती लाभलेले सुलेखनकार अच्युत पालव यांनी साकारलेल्या अक्षरशिल्पांच्या चित्रप्रतिमा विराजमान झाल्या आहेत. वाचनासंबंधींचे थोरामोठ्यांच्या विचारांसोबतच अक्षर, शब्द यांचे विभ्रम पालव यांनी सुलेखनातून सुरेख साकारले आहेत.
ठाणे शहर हे वाचनस्नेही बनविण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम महापालिकेने सुरू केले आहेत. त्यात, ठाणे महापालिकेच्या उद्यानात निर्सग वाचनालये सुरू करण्यात आली आहेत. झोपडपट्टी तेथे वाचनालय हा उपक्रमही लवकरच सुरू होणार आहे. त्याचबरोबर, महापालिकेच्या सर्व शाळांमधील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्गखोल्यांमध्ये ‘वाचन कोपरा’ तयार करण्यात येत आहे. या उपक्रमाचा पहिला प्रयोग किसन नगर येथील शाळा क्रमांक २३मध्ये करण्यात आला आहे. या वाचन कोपऱ्यातील पुस्तके वाचून विद्यार्थ्यांनी त्यांना देण्यात आलेल्या वाचनाच्या पासबुकमध्ये त्या पुस्तकाबद्दलच्या नोंदी करायच्या आहेत. याही उपक्रमाचे उद्घाटन मुख्य सचिव नितीन करीर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.