ठाणे : ठाणेकरांची वाढती पाण्याची मागणी लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने स्टेमकडून वाढीव १० दशलक्ष लिटर पाण्याची मागणी केली होती. त्यानुसार यापैकी दिवाळीपूर्वी ठाणे शहरासाठी स्टेमनेअतिरिक्त ६ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा वाढविल्याची माहिती पालिकेने दिली. त्यानंतर आता येत्या काही दिवसात उपलब्ध साठ्यानुसार उर्वरीत पाणीपुरवठा करता येऊ शकतो की नाही याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस चांगला झाला आहे. ठाणे शहराला आजघडीला ४८५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. यामध्ये स्टेमकडून ११०, स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २१०, बीएमसीकडून ६० आणि एमआयडीसीकडून ११० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. परंतु, एवढे असतांनाही केवळ आधी नियोजन न झाल्याने ठाणेकरांवर आजही पाणीबाणीची समस्या निर्माण होतांना दिसत आहे. आज शहराला मुबलक पाणीपुरवठा होत असल्याचा दावा जरी पालिकेकडून केला जात असला तरी वास्तविक पाहता तो कट टू कट तो केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातही काही ठिकाणी कमी दाबाने तर काही ठिकाणी प्रेशरने पाणीपुरवठा होत आहे. काही ठिकाणी २० ते २५ वर्षे जुन्या जलवाहिन्या असल्यानही पाणीपुरवठा योग्य रितीने होतांना दिसत नाही. एकूणच याचा परिणाम म्हणून काही भागांना सुरळीत तर काही भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतांना दिसत आहे. त्यामुळेच शहराची वाढती लोकसंख्या गृहसंकुले आदींची संख्या लक्षात स्टेमकडून १० दशलक्ष लिटर वाढीव पाण्याची मागणी महापालिकेमार्फत करण्यात आली होती. त्यानुसार १० दक्षलक्ष ऐवजी ६ दशलक्ष लिटर वाढीव पाणी स्टेमकडून देण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठाविभागाने दिली.उर्वरित ४ दशलक्ष लिटर पाण्यासाठी प्रयत्नस्टेमकडून शहरातील काही महत्त्वाचे भाग, घोडबंदर, वागळे इस्टेट, इंदिरानगर आदी भागांसह जवळ जवळ संपूर्ण शहरालाच पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या वाढीव पाण्यामुळे काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न पालिकेने केला आहे. परंतु, आणखी शिल्लक ४ दशलक्ष लिटर वाढीव पाणीपुरवठा मिळविण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचेही पालिकेच्या संबधींत विभागाने स्पष्ट केले. मुबलक पाणीपुरवठ्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्टेमने पालिकेला कळविले आहे. त्यामुळे ठाणेकरांना तूर्तास ६ दक्ष लिटर वाढीव पाण्यावरच समाधान मानावे लागेल.