- जितेंद्र कालेकर ठाणे - शुक्रवारी पहाटे ४:३० ते ६:३० दरम्यानची वेळ... ठाणे पश्चिमेकडील प्रवेशद्वारासमोर खाकी शर्टातील रिक्षाचालकांची गर्दी... हातात बॅगा, पिशव्या घेतलेले प्रवासी दिसताच हे रिक्षाचालक त्यांच्या दिशेने येतात. घोडबंदर रोड पातलीपाडासाठी २५० रुपये, तर भाईदरकरिता थेट ६०० रुपये असे ओरडत असतात. वंदना सिनेमा एसटी बस स्टँड या भाड्यासाठी ५० रुपये सांगतात. रामप्रहरी रेल्वे प्रवाशांची ठाणे स्थानकात उतरल्यावर होणारी लूटमार प्रतिनिधीला पाहायला मिळाली. ठाणे रेल्वेस्थानकातून मुंबईकडे येणाऱ्या (अप) १०५ आणि मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या (डाऊन) रेल्वे गाड्यांची संख्या तितकीच १०५ आहे. पहाटेच्या सुमारास मुंबईकडे जाताना ठाण्यात थांबणाऱ्या गाड्यांची संख्या ३० ते ४० इतकी आहे.
अशी होते रिक्षाचालकांकडून लूट- ठाणे ते घोडबंदर रोडवरील पातलीपाड्यासाठी १ रिक्षाचालक थेट २५० रुपये होतील, असे सांगतात. प्रत्यक्षात हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा या ठिकाणी मीटरप्रमाणे १२५ ते १३० रुपये होतात. रात्री १२ ते पहाटे ५ या वेळेत सुमारे १८० ते २०० इतके भाडे होते; मात्र रिक्षाचालक ठोक २५० रुपये वसूल करतात.- ठाणे स्टेशन ते भाईंदरसाठी थेट ६०० रुपये वसूल केले २ जातात. भाईदरपर्यंत मीटरने गेले तर ४०० रुपये होतात. वंदना सिनेमा एसटी स्टॅन्डसाठी ५० रुपये मागितले जातात. या अंतराकरिता ३० रुपये भाडे आहे.
रिक्षाचालकांची अक्षरशः 'भाईगिरी' असतेपहाटे ३ वाजून १० मिनिटांनी पहिली कोणार्क एक्स्प्रेस ही भुवनेश्वर-मुंबई रेल्वे ठाण्यात थांबते. तेव्हापासून ८ वाजेपर्यंत रिक्षाचालकांची मनमानी सुरू असते. मुंबईच्या दिशेकडे असलेल्या प्रवेशद्वारासमोर आणि कल्याण बाजूकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील प्रवेशद्वारासमोर रिक्षाचालकांची अक्षरशः 'भाईगिरी' सुरु असते. त्यावेळी ना वाहतूक शाखेचा पोलिस असतो ना प्रादेशिक परिवहन विभागाचा (आरटीओ) कर्मचारी तिथे असतो.
भल्या पहाटेपासून अनेक ट्रेनमधून शेकडो प्रवासी ठाण्यात उतरतात. काही वेळा परदेशी नागरिकांचाही यात समावेश असतो. प्रवाशांना महत्त्वाच्या ठिकाणांसह रिक्षा आणि टॅक्सीचे योग्य दर माहिती होण्यासाठी अधिकृत फलक लागले पाहिजे. आरपीएफ, रेल्वे पोलिस आणि वाहतूक पोलिसांची पथकेही तैनात केली पाहिजेत.- अवधेश कुमार, सहायक स्टेशन मास्तर, ठाणे रेल्वे स्टेशन.
कोणीही रिक्षाचालक जादा भाडे आकारणी करीत असेल तर त्यांच्यावर नियमित कारवाई केली जाते. ठाणे स्टेशनजवळील या प्रकाराचीही माहिती घेऊन त्याठिकाणी विशेष मोहीम राबवून कारवाई केली जाईल. - पंकज शिरसाठ(पोलिस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर)