लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: संचारबंदी लागू झाल्यापासून ठाणे ग्रामीण पोलिसांनी गेल्या २५ दिवसांमध्ये १४ हजार ८८८ चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये खटले दाखल केले आहेत. त्यांच्याकडून ५४ लाख ३२ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला असून त्यातील ८२६ वाहने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्हयातील सर्वच भागांमध्ये संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर २७ नाक्यांसह पाचही उप विभागांमध्ये तीव्रपणे कारवाईची मोहीम राबविली जात आहे.मीरा रोड आणि भार्इंदर या शहरी भाग असलेल्या उपविभागांमध्ये नागरिक विनाकारण रस्त्यावर येण्याचे प्रमाण अधिक आहे. भार्इंदर विभागामध्ये २२ मार्च ते १५ एप्रिल २०२० या कालावधीमध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणारे, मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या ८०१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून १०३ गुन्हे दाखल केले आहेत. त्यापाठोपाठ मीरा रोड विभागात ३५२ जणांविरुद्ध १३९ गुन्हे दाखल झाले आहेत. तर शहापूर सारख्या ग्रामीण भागातही १३१ नागरिकांनी संचारबंदीचे उल्लंघन केले. त्यांच्याविरुद्ध ६१ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ कोरोनाच्या रुग्ण आढळलेल्या मुरबाड विभागामध्ये ७७ जणांविरुद्ध ३० गुन्हे दाखल झाले आहेत. तर गणेशपूरी या विभागात अत्यल्प म्हणजे ४८ जणांविरुद्ध २३ गुन्हे दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. २२ मार्च ते १५ एप्रिल या २५ दिवसांच्या कालावधीमध्ये एक हजार ४०९ जणांविरुद्ध ३५६ गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय, ग्रामीणच्या वाहतूक नियंत्रण शाखेकडून १४ हजार ८८८ जणांविरुद्ध कारवाई झाली आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने केलेल्या कारवाईमध्ये वाहतूक पोलिसांनी ८२६ वाहने जप्त केली असून आतापर्यंत ५४ लाख ३२ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केली आहे. वैद्यकीय तसेच अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त बाहेर पडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांनी त्यांचे फिक्स पाँर्इंटही बदलले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून कारवाई होण्यापेक्षा कोरोनासारख्या साथीच्याा आजाराला दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून शिस्त पाळावी. स्वत:बरोबर आपल्या कुटूंबियांचेही जीव धोक्यात घालू नये आणि घराबाहेर पडू नये,असे आवाहन ठाणे ग्रामीण पोलिसांनी केले आहे.