ठाणे : ठाण्याच्या उथळसर भागातील चाळीत दहा बाय दहाच्या खोलीत राहणारा विशाल कराड या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत सर्वच विषयांत ३५ टक्के गुण मिळवून यशाचा ‘काठा’वर पाेहाचला आहे. त्याच्या अनाेख्या यशाचीही चांगलीच चर्चा रंगली आहे.
विशाल हा शिवाईनगर येथील शिवाई विद्यालयात शिकत होता. वडील अशोक कराड रिक्षा चालवून कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. विशालची आई ज्योती कराड या दिव्यांग असून घरकाम करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावतात. बेताची परिस्थिती असलेल्या विशालने खूप शिकून मोठे बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. ३५ टक्के गुण मिळाले तरी प्रचंड मेहनत करून भविष्यात मॅकेनिकल इंजिनिअर बनणार असल्याचे त्याने सांगितले.
दरम्यान, त्याला सर्वच विषयांत मिळालेले ३५ टक्के गुण हे यश इतर मुलांप्रमाणेच आहे. त्याच्या यशात आम्ही आनंदी आहोत, असे मत त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केले. विशाल म्हणाला की, मला ४० टक्क्यांची अपेक्षा होती, पण जे काही गुण मिळाले त्यात मी समाधानी आहे. निकाल हातात आल्यावर प्रथम मी पास आहे का, हे तपासले त्यानंतर सगळ्या विषयांत ३५ टक्के मिळाल्याचे दिसले. आम्ही सर्व या यशाने खुश असल्याचे विशालने सांगितले.