- मुरलीधर भवार
डोंबिवली - साखरपुड्याला नवरीचा मेकअप करण्यासाठी त्या दोघी आल्या. रुममध्ये मेकअप सुरु असताना त्या दोघांची नियत फिरली. त्यांनी मग नवरीच्या पर्समधील दागिने आणि रोकडवर हात मारुन पसार झाल्या. डाेंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोघींनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे कल्पना राठोड आणि अंकिता परब अशी आहेत. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
१५ ऑगस्ट रोजी मुलुंड येथे राहणाऱ्या पूजा गुप्ता या २३ वर्षीय तरुणीचा साखर पुडा होता. साखर पुडा कार्यक्रम सुरु असताना सर्व पाहूणे मंडळी डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कल येथील सोनल हॉलमध्ये जमा झाली होते. कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमात नवरदेव, पाहूणे व्यस्त असताना हॉलमधील ज्या रुममध्ये नवरीचे साहित्य ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी कोणी नव्हते. याच वेळी पूजा गुप्ताचा मेकअप करणाऱ््या कल्पना राठोड आणि अंकिता परब या दोघी रुममध्ये आल्या. पूजा गुप्ताची पर्स पाहून दोघींची नियत फिरली. कल्पना हिने पूजाच्या पर्समधील दागिने काढून घेतले. तर अंकिता हिने पर्समधील रोकड चोरली. कार्यक्रमानंतर त्या दोघी पसार झाल्या.
आपले दागिने हरवल्याचे पूजाच्या लक्षात येताच तिने या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी योगेश सानप, प्रशांत सरनाईक, विशाल वाघ. देविदास पोटे, आशा सुर्यवंशी यांच्या पथकाने तपास सुरु केला. हॉलमधील सीसीटीव्ही चेक करण्यात आला. सीसीटीव्हीत कल्पना आणि अंकिता या दोघी पूजाच्या रुममध्ये ये-जा करीत होत्या. दोघींना ताब्यात घेऊन पोलिस तपास सुरु केला. आधी त्या दोघींनी हे कृत्य केले नसल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी त्या दोघींना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी कबूली दिली. दागिने पाहून नियत फिरल्याने दागिने आणि रोकड चोरी केले असे सांगितले. या पैकी कल्पना ही मालाड येथे राहणारी असून अंकिता ही नालासोपारा येथे राहते.