- जितेंद्र कालेकरठाणे - कॅटरिंगच्या कामात चांगल्या पगाराची नोकरी देतो, या अमिषाने बिहारमधून ठाण्यात शरीरविक्रयाच्या व्यवसायामध्ये आणणाऱ्या श्रवणकुमार चौधरी (२६, रा. शिमला, जि. औरंगाबाद, बिहार) याला अटक केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी गुरुवारी दिली. त्याला २३ जानेवारी रोजी अटक केल्यानंतर त्याच्याकडील चौकशीत ही माहिती समोर आल्याचे त्यांनी सांगितले. तिची पाच लाखांमध्ये विक्री करतांना ठाणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले हाेते.
बिहारच्या शिमला गावातील श्रवणकुमार याची त्याच गावातील एका किराणा दुकानामध्ये या पिडित मुलीची काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. तिला त्याने मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी देतो, असे सांगून दुचाकीवरुन पटणा रेल्वे स्टेशनला आणले. तिने घरी याबाबतची माहिती देण्याचा आग्रह त्याच्याकडे धरला तेंव्हा घरी नंतर सांगता येईल, असे सांगत त्याने तिला घरी ही माहिती देण्यापासून परावृत्त केले. पटणा येथून रेल्वेने हे दोघेही ठाण्यात आले. तेंव्हा वागळे इस्टेट येथील द्वारका हॉटेलमध्ये तो तिच्यासाठी एका ग्राहकाच्या शोधात असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घाेडके यांना मिळाली.
त्याच माहितीच्या आधारे घाेडके यांच्यासह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या संयुक्त कारवाईत २३ जानेवारी रोजी तिची पाच लाखांमध्ये विक्री करतांना त्याला या हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या तावडीतून तिची सुटका केली असून मोबाईल, रोकड इतर मुद्देमाल त्याच्या ताब्यातून हस्तगत केला आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यासह अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का? त्याने यापूर्वीही असा प्रकार केला आहे का? याबातचा तपास सुरु असल्याचे उपायुक्त पाटील यांनी सांगितले.