- सुरेश लोखंडेठाणे - सुमारे १५ वर्षे हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात होता. अवघी पाच वर्षे काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शांताराम घोलप यांनी केले. त्यानंतर मात्र आजवर काँग्रेसला या मतदारसंघावर वर्चस्व सिद्ध करता आले नाही. पण, या मतदारसंघात काँग्रेसने भाजपाशी जोरदार लढत दिली आहे. भाजपा-शिवसेना युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ १९९६ मध्ये शिवसेनेला सोडण्यात आला. त्यावेळी सेनेचे उमेदवार प्रकाश परांजपे यांनी चार लाख ६६ हजार ७७३ मते घेऊन काँग्रेसचे हरिवंश सिंह यांचा पराभव केला आणि शिवसेनेने या मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित केले. हरिवंश सिंह यांना दोन लाख ७४ हजार ६११ मते मिळाली होती. समाजवादी पार्टीचे आगरीसेनेचे संस्थापकीय अध्यक्ष राजाराम साळवी यांना एक लाख ५३ हजार ८७० मते मिळाली होती. या तिरंगी लढतीत सर्वाधिक म्हणजे ३५ उमेदवार उभे होते. यामध्ये एसएमपी, तिवारी काँग्रेस आणि एसजेपीएम या राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनी नशीब आजमावले होते.ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या १९९८ च्या निवडणुकीत खासदार प्रकाश परांजपे हे रिंगणात उतरले होते. त्यावेळी काँग्रेसने लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीला हा मतदारसंघ सोडला होता. स्थानिक उमेदवार म्हणून राजाराम साळवी यांना पुन्हा उमेदवारी देण्याऐवजी सपाने चंद्रिका केनिया यांना उमेदवारी दिली. त्याचा फायदा परांजपे यांना झाला. परांजपे यांनी पाच लाख ५३ हजार २१० मते घेऊन विजय प्राप्त केला होता.१९९८ च्या निवडणुकीत प्रकाश परांजपे यांनी दोन लाख ४९ हजार ५८९ मतांची आघाडी घेतली होती. केनिया यांना तीन लाख तीन हजार ६३१ मते मिळाली होती. बहुजन समाज पार्टीचे उमेदवार अॅड. राहुल हुमणे यांना (२४,७०५) तिसऱ्या तर अरुण गवळी संस्थापक अध्यक्ष असलेल्या अखिल भारतीय सेनेचे उमेदवार शरद वासुदेव नाईक (११,६७३) यांना चौथ्या क्रमांकाची मते होती. त्यावेळी नॅशनल पँथर पार्टी, इंडियन युथ मुस्लिम लीग या राजकीय पक्षांसह १० अपक्ष उमेदवार १९९८ च्या निवडणुकीतहोते.या निवडणुकीनंतर सुमारे १३ महिन्यांच्या कालावधीत केंद्रातील भाजपा सरकार पडले आणि परांजपे यांना १९९९ च्या निवडणुकीला पुन्हा तोंड द्यावे लागले. वर्षदोन वर्षांनी निवडणुका लादूनही परांजपे मतदारांच्या पसंतीला उतरले होते. ठाणे जिल्ह्याच्या राजकारणातील दिग्गज व इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार नकुल पाटील आणि नॅशनल काँग्रेसचे प्रभाकर हेगडे यांच्याशी टक्कर देत परांजपेंनी या निवडणुकीतही तीन लाख ९१ हजार ४४६ मते घेऊन विजय संपादन केला होता. ९९ हजार ६८३ मतांची आघाडी घेऊन त्यांनी नकुल पाटील (२,९१,७६३) यांचा पराभव केला. हेगडे यांना एक लाख ७७ हजार २५६ मते मिळाली होती.शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार म्हणून परांजपे यांना पुन्हा संधी मिळाली. सतत आठ वर्षे खासदार राहिल्यानंतर त्यांना काँग्रेस उमेदवारांचा पराभव करणे सोपे झाले होते. त्यामुळे या मतदारसंघावरील काँग्रेसचे वर्चस्व कमी झाले होते. यावेळी मात्र मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य वाढले होते. त्यामुळे २००४ च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसने मित्रपक्ष राष्ट्रवादीसाठी ही जागा सोडली होती. यावेळी सेनेचे परांजपे व राष्ट्रवादीचे डावखरे या दोन्ही जिवलग मित्रांमध्ये लढत झाली. परांजपे यांनी सहा लाख ३१ हजार ४१४ मते घेऊन डावखरे यांचा पराभव केला. डावखरे यांनी सहा लाख नऊ हजार १५६ मते घेऊन अवघ्या २१ हजार २५८ मतांनी पराभव पत्करला होता. या निवडणुकीला १० उमेदवार रिंगणात होते. त्यातील बसपा, एचजेपी, सपा आणि पीआरबीपी या राजकीय पक्षांनी या निवडणुकीत उमेदवार दिले होते.या निवडणुकीचा विजय मात्र तीन वर्षे १० महिन्यांच्या काळापुरताच मर्यादित राहिला. या कालावधीत दीर्घकाळ आजारी राहिलेले खासदार प्रकाश परांजपे यांचे निधन झाले. सुमारे १५ वर्षे सेनेच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघावर परांजपे यांनी सलग १३ वर्षे १० महिने खासदार म्हणून वर्चस्व सिद्ध केले. परांजपे यांच्या निधनानंतर १४ महिन्यांच्या कालावधीसाठी मे २००८ मध्ये पोटनिवडणूक लागली. सेनेच्या दिग्गज नेत्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले. सेनेने सहानुभूतीचा फॅक्टर वापरून परांजपे यांचे ज्येष्ठ पुत्र आनंद परांजपे यांना उमेदवारी दिली होती.ठाणे, बेलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण आणि मुरबाड या जुन्या विधानसभा मतदारसंघांत ठाणे लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात आली. ३६ लाखांच्या या मतदारसंघात राजकारणाचा कोणताही अनुभव नसलेले आनंद परांजपे या मित्राच्या चिरंजीवासमोर प्रतिस्पर्धी म्हणून पोटनिवडणूक लढवणे राष्ट्रवादीचे डावखरे यांना मान्य नव्हते. शिवाय, १४ महिन्यांच्या कालावधीसाठी खासदार म्हणून राहणे अन्य राष्ट्रवादीच्या नेत्यांना पसंत नव्हते. त्यामुळे आनंद परांजपे यांचा बिनविरोध विजय होण्याची शक्यता दिसत होती. सोयीनुसार राजकारण केले जाते, असा संदेश मतदारांमध्ये जाऊन पुढील निवडणुकीत अडचणीत येण्यापेक्षा पोटनिवडणूक लढवणे गरजेचे आहे, असा दूरदृष्टीचा विचार करून राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेतृत्वाने या तरुण प्रतिस्पर्धी उमेदवारासमोर तरुण उमेदवार देण्याचा निश्चय केला. त्यानुसार, नवी मुंबईचे तत्कालीन महापौर संजीव नाईक यांना उमेदवारी दिली. ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मतदारसंघ पिंजून काढला. राष्ट्रवादीचे अख्खे मंत्रिमंडळ या मतदारसंघात प्रचार करताना दिसत होते. तरीही, सेनेचे आनंद परांजपे यांनी सुमारे ९५ हजार मतांची आघाडी घेऊन विजय मिळवला आणि सेनेचे सहानुभूतीचे कार्ड यशस्वी ठरले.२००९ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली. त्यावेळी आनंद परांजपे यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे लक्षात येताच सेनेचे तत्कालीन आमदार सुभाष देसाई, आमदार एकनाथ शिंदे, अनंत तरे आदी नेत्यांची नावे चर्चेत होती. परंतु, नवी मुंबईतील विजय चौगुले यांना उमेदवारी देऊन काट्यानेच काटा काढला. या नव्या मतदारसंघासाठी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, आमदार जितेंद्र आव्हाड, संजीव नाईक या इच्छुकांची नावे चर्चेत होती; पण, याआधी १४ महिन्यांच्या पोटनिवडणुकीसाठी लढलेले संजीव नाईक यांचा दावा राष्टÑवादीने मान्य करून त्यांना उमेदवारी दिली होती. राष्टÑवादीने नवा ठाणे मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी अहोरात्र परिश्रम केले. (समाप्त)२००९ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली. त्यावेळी आनंद परांजपे यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे लक्षात येताच सेनेचे तत्कालीन आमदार सुभाष देसाई, आ. एकनाथ शिंदे, अनंत तरे यांची नावे चर्चेत होती. परंतु, नवी मुंबईतील विजय चौगुले यांना उमेदवारी देऊन काट्यानेच काटा काढला. नव्या मतदारसंघासाठी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, आ. जितेंद्र आव्हाड, संजीव नाईक या इच्छुकांची नावे चर्चेत होती; पण, याआधी १४ महिन्यांच्या पोटनिवडणुकीसाठी लढलेले संजीव नाईक यांचा दावा राष्टÑवादीने मान्य करून त्यांना उमेदवारी दिली.गेल्या निवडणुकीत (२०१४) या मतदारसंघातून संजीव नाईक पुन्हा रिंगणात होते. त्यांना सेनेचे राजन विचारे यांच्याशी सामना करावा लागला आणि ते पराभूत झाले. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या निवडणुकीत सेनेच्या गोटातून विजयी झालेले आनंद परांजपे यांना राष्टÑवादीने उमेदवारी दिली. पण, सेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विजय मिळवला.जिल्ह्यातील ठाणे, कल्याण मतदारसंघांच्या विजयासह पालघरमध्ये भाजपाचे चिंतामण वनगा यांनी (५३२९९६) आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे (२९३५६९) बळीराम जाधव यांचा पराभव केला. वनगा यांच्या निधनानंतर या जागेवर काँग्रेस सोडून आलेले राजेंद्र गावित भाजपातून विजयी झाले. भिवंडी मतदारसंघात राष्टÑवादीतून भाजपात गेलेले कपिल पाटील यांचाही विजय झाला. जिल्ह्यातील या चार मतदारसंघांत त्यावेळी ३७ लाख ५८ हजार ३०२ मतदान झाले होते.
ठाणे मतदारसंघात १५ वर्षे भाजपाच, युतीच्या जागावाटपात १९९६ मध्ये मतदारसंघ गेला शिवसेनेकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 4:31 AM