- अजित मांडके
ठाणे - कळवा-खारेगाव,आझाद चौकातील तळ अधिक दोन मजली साई सपना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब व टेरेसची भिंत पडल्याची घटना बुधवारी दुपारी सव्वा एक ते दीड वाजण्याच्या सुमारास समोर आली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून तेथे पार्क केलेल्या दुचाकीचे नुकसान झाले आहे. ही इमारत ३५ ते ४० वर्षे जुनी असून त्यामधील बारा कुटुंबाला जवळील ठाणे महापालिका शाळा क्रमांक ६७ मध्ये तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था केली आहे. तर सुरक्षेच्या दृष्टीने त्या इमारतीला धोकापट्टी लावण्यात आली आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिले.
कळवा- खारेगाव परिसरात इमारतीचा स्लॅब व टेरेसची भिंत कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त ,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी- कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कार्यालयीन अधीक्षक, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, बांधकाम विभागाचे कर्मचारी, टोरंट पॉवर कंपनीचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. तात्काळ इमारतीमधील रहिवाशांना आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान व रहिवाशांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तसेच त्या रहिवाशांची राहण्याची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात ठामपा शाळा क्रमांक ६७ मध्ये करण्यात आली आहे. दरम्यान इमारतीचा स्लॅब पडल्यामुळे इमारती जवळ पार्क केलेली दुचाकीचे नुकसान झाले आहे.
या ३५ ते ४० वर्षे जुन्या इमारतीमध्ये एकूण १२ सदनिका असून तळ आणि पहिल्या तसेच दुसऱ्या मजल्यावर प्रत्येकी ४ सदनिका आहेत. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.