Thane: शरद पवार हे श्रद्धास्थानीच, देशात नरेंद्र मोदींसारखा मोठा नेता नाही, अजित पवारांकडून पुनरुच्चार
By जितेंद्र कालेकर | Published: August 9, 2023 11:13 PM2023-08-09T23:13:29+5:302023-08-09T23:14:40+5:30
Ajit Pawar: आम्ही शरद पवार साहेबांना पाहूनच राजकारणात आलो. ते आमचे श्रद्धास्थानी आहेत. त्यामुळे घरी आणि कार्यालयातही त्यांचा फोटो आहे. देशात नरेंद्र मोदींसारखा मोठा नेता नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यात स्पष्ट केले.
- जितेंद्र कालेकर
ठाणे - आम्ही शरद पवार साहेबांना पाहूनच राजकारणात आलो. ते आमचे श्रद्धास्थानी आहेत. त्यामुळे घरी आणि कार्यालयातही त्यांचा फोटो आहे. देशात नरेंद्र मोदींसारखा मोठा नेता नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यात स्पष्ट केले.
ठाण्यातील अजित पवार गटाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट आणि भाजप एनडीए आघाडीच्या ४८ पैकी सर्वाधिक जागा निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्याचा सर्वांगिण विकासाची भूमिका राहणार असल्याचेही ते म्हणाले.
फोटो नका लावू हे पवार साहेबांचे मत
कार्यालयात किंवा कुठेही आपला फोटो लावू नका हे साहेबांचे मत झाले. पण आमच्या ते श्रद्धास्थानी आहेत. त्यामुळे त्यांचा घरात आणि कार्यालयातही फोटो राहील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यातील कार्यालयात असलेल्या शरद पवार यांच्या फोटोबाबत स्पष्ट केले. शरद पवार यांचे समर्थक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबद्लच्या काेणत्याही प्रश्नाला उत्तर देण्याचे मात्र, त्यांनी प्रकर्षाने टाळले.
मराठा समाजाला योग्य न्याय मिळावा ही सर्वच राजकीय पक्षाची भूमिका आहे. पण याबाबत अंतिम निर्णय हा न्याय देवताच घेईल असे अजित पवार म्हणाले. तसेच सध्या तरी आमचे लक्ष हे लोकसभा निवडणूक आहे.या निवडणुकीत जास्तीत जास्त यश मिळविण्याचा आमचा प्रयत्न राहील. लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीतील घटक पक्षातील प्रमुख नेते एकत्र येऊन विधानसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा करतील. असे पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.