ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा शिवसेनेचे राजन विचारे यांनी विजय संपादित केला आहे. ठाणे विधानसभा क्षेत्रात विचारे यांच्या मतांमध्ये मागील लोकसभेच्या तुलनेत तब्बल ४० हजारांची वाढ झाल्याचे दिसून आले. तर, राष्टÑवादीच्या उमेदवाराच्या मतांमध्ये घट झाली आहे. विचारे यांना यंदा ठाणे विधानसभा क्षेत्रातून एक लाख ३० हजार ७६३ मते मिळाली आहेत. तर, राष्टÑवादीचे आनंद परांजपे यांना या मतदारसंघातून ४७ हजार ६५५ मते मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या मतांचा फायदा युतीच्या उमेदवाराला निश्चित होणार असून आघाडीच्या उमेदवाराला या मतदारसंघात तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाणे विधानसभा क्षेत्र हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु, या बालेकिल्ल्यावर मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने कब्जा केला आहे. असे असले तरी लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे दोनही पक्ष युतीत लढल्याने त्याचा फायदा विचारे यांना झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपच्या १३ नगरसेवकांचे वर्चस्व आहे. तर, राष्टÑवादीचे अवघे चार नगरसेवक आहेत. त्यात काँग्रेसचा येथे सफाया झाला आहे. या मतदारसंघात काँग्रेस असून नसल्यासारखीच परिस्थिती असल्याचे मतमोजणीनंतर दिसून आले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी, काँग्रेस आणि मनसेच्या उमेदवारांना मिळून या मतदारसंघातून ४८ हजार ५८४ मते मिळाली होती. आता लोकसभा निवडणुकीत त्यातही ९२९ मतांची घट झाल्याचे दिसून आले. परंतु, शिवसेनेच्या मतांमध्ये मात्र एक हजार ५२९ मतांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आघाडीसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला ४,८८४ मते मिळाली. त्यामुळे त्याचा फारसा परिणाम या निवडणुकीत दिसून आला नाही.परंतु, ज्या पद्धतीने शिवसेनेने या मतदारसंघात मुसंडी मारली, त्यानुसार त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत नक्कीच दिसणार असून काँग्रेस, राष्टÑवादीला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार, हे नक्की.संघटनात्मक काम, रणनीतीचा विजयया निवडणुकीत ठाणे विधानसभा क्षेत्रात सुरुवातीला भाजपच्या नगरसेवकांनी विचारे यांना विरोध केला होता. परंतु, त्यानंतर त्यांचा हा विरोध मावळला आणि विचारे यांना या मतदारसंघातून निर्णायक मतांची आघाडी मिळाली.या मतदारसंघातून शिवसेना आणि भाजपने संघटितपणे काम केल्याचे दिसून आले. त्यामुळे हा संघटनात्मक आणि त्यातून आखलेल्या रणनीतीचा हा विजय असल्याचे स्पष्ट झाले.दुसरीकडे राष्टÑवादी आधीच या मतदारसंघात कमकुवत असल्याचे दिसत होते. परंतु, मेट्रो, नवीन ठाणे स्टेशन, कचºयाचा मुद्दा आदींसह इतर स्थानिक मुद्यांना हात घालतानाच शिक्षणाच्या मुद्यालाही राष्टÑवादीने हात घातला. त्यांचे हे सर्वच कळीच मुद्दे या निवडणुकीत फेल ठरल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. राष्टÑवादीच्या तुलनेत काँग्रेसची फारशी मदत झाली नसल्याचेच दिसले. मनसेने ही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज ठाकरे यांच्या मोदीविरोधी भुमिकेचा राष्टÑवादीला फायदा झाला नाही.