ठाणे : शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्टÑवादीचे आनंद परांजपे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज भरले. या मतदारसंघात खरी लढत ही शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. खबरदारी म्हणून दोन्ही उमेदवारांच्या मिरवणुकींचे मार्ग वेगवेगळे ठरवून देण्यात आले होते. दोन्ही उमेदवारांनी यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले; परंतु उन्हामुळे कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच दमछाक झाली.
सोमवारी सकाळी राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिरवणूक काढली. यावेळी त्यांच्यासमवेत आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत सागर नाईक, ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे, सचिन शिंदे आदींसह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. यानिमित्ताने राष्टÑवादीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. नियोजन सकाळी १० वाजताचे असले, तरी प्रत्यक्षात सकाळी ११.३० च्या सुमारास राष्टÑवादीच्या कार्यालयापासून रॅली पुढे निघाली. अल्मेडा चौकातून गजानन महाराज मठ, नौपाडा, तलावपाळी, शिवाजी महाराजांचा पुतळा, चिंतामणी चौकातून सरळ सिव्हील रुग्णालयमार्गे रॅली शासकीय विश्रामगृहाजवळ पोहोचली.
दुसरीकडे, शिवसेनेची रॅलीही न्यू इंग्लिश शाळेजवळील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळून सकाळी १० वाजता काढण्याचे ठरले होते; परंतु तिचाही मुहूर्त हुकला. ही रॅली राममारुती रोड, गोखले रोड, गावदेवीमार्गे अशोक टॉकीज, प्रभात सिनेमा, तहसीलदार कार्यालय, कौपिनेश्वर मंदिर, जांभळीनाक्यावरून पुढे कोर्टनाक्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. यावेळी युतीमधील प्रमुख नेत्यांसह महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दुपारी १.३० च्या सुमारास उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला.
१२.२० चा मुहूर्तसकाळी १० वाजता मिरवणूक निघेल, अशी आशा राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना होती. परंतु, रॅली निघण्यास उशीर झाला. त्यामुळे परांजपे यांनी गणेश नाईक यांच्यासमवेत चालत जाऊन निवडणूक कार्यालय गाठले आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा १२.२० चा मुहूर्त अखेर साधलाच.
जयंत पाटील यांना उशीर : दोन दिवस निवडणूक कार्यालय बंद असल्याने राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी मिळाली नव्हती. सोमवारी सकाळी ११.२० च्या सुमारास ही परवानगी मिळाली. त्यानंतर, १२.४० च्या सुमारास जयंत पाटील ठाण्यात दाखल झाले. परंतु, तोपर्यंत उमेदवारी अर्ज भरून झाला होता.
शिक्षणाच्या मुद्यावर जो प्रचार विरोधकांकडून सुरू आहे, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. मी ३५ वर्षांपासून जनतेची सेवा करत आहे. जनता माझ्यावर पुन्हा विश्वास टाकेल, यात दुमत नाही.- राजन विचारे, शिवसेनाविद्यमान खासदारांंनी पाच वर्षांत काय केले, हे सर्वांनाच माहीत आहे. मोदींविरुद्ध जनतेच्या मनात आक्रोश आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे.- आनंद परांजपे, राष्टÑवादी