ठाणे: कळव्यातील ओम कृष्णा को- ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब दुसऱ्या मजल्यावर कोसळूनमनोहर दांडेकर (७०) यांच्यासह एकाच कुटूंबातील तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने, याच इमारतीमधील इतर ९० ते १०० रहिवाशी सुखरुप बचावले असून त्यांची तात्पूरती इतरत्र सोय करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ही इमारत ३० ते ३५ वर्षे जुनी असून ती सी - वन या धोकादायक म्हणजे दुरुस्ती करण्यापलीकडे असलेल्या वर्गवारीमध्ये मोडते. या घटनेमध्ये मनोहर दांडेकर यांच्यासह, मनीषा (६५) आणि मयूर (४०) हे तिघेजण जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेनंतर इमारतीमधील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच इमारत धोकादायक असल्याने ती रिकामी केल्याने तेथील ३० सदनिकांमधील सुमारे १०० रहिवाशांनी त्यांची राहण्याची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात नातेवाईकांकडे केली आहे. याशिवाय, सुरक्षेच्या दृष्टीने या इमारतीला धोकापट्टी लावल्याचे ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले.
कळव्यातील भुसार आळी येथे तळ अधिक चार मजली या ओम कृष्ण हाऊसिंग सोसायटी या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक ३०२ मधील हॉलचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक २०२ मध्ये कोसळला. या घटनेत तिघे रहिवासी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महापालिका अधिकारी- कर्मचारी , कळवा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. या पथकांनी जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यामध्ये मनोहर यांच्या डाव्या हाताला, मनिषा यांच्या कमरेला आणि छातीला तर मयूर यांच्या पायाला आणि पाठीला दुखापत झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
इमारत अति धोकादायक वर्गवारीतील
ही इमारत ३० ते ३५ वर्षे जुनी आहे. ती ए वन या धोकादायक वर्गवारीतील म्हणजेच दुरुस्त करण्यापलीकडे आहे. तळ अधिक चार मजली इमारतीत एकूण ३० सदनिका आहेत. तळ मजल्यावर सात तर पहिल्या मजल्यावर पाच आणि दोन, तीन आणि चार या मजल्यांवर प्रत्येकी सहा सदनिका आहेत. आता इमारत रिकामी केली आहे. पुढील कार्यवाही ठामपा बांधकाम विभाग व अतिक्रमण विभाग यांच्याकडून करण्यात येणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.