- जितेंद्र कालेकर ठाणे - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई आणि ठाणे विभागाच्या पथकांनी ठाणे जिल्हयातील गावठी दारुच्या अड्यांवर बुधवारी धाडसत्र राबविले. या धाडीत गावठी दारु, गावठी दारु निर्मितीसाठी लागणारे रसायनासह २८ लाख ११ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती काेकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी गुरुवारी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे काेकण विभागीय उपायुक्त पवार यांच्या आदेशाने महात्मा गांधी जयंती सप्ताहानिमित्त दारु निर्मितीच्या अड्डयांवर २ ऑक्टाेबर राेजी धाडसत्र राबविण्यात आले. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्व उपअधीक्षक, मुंबई उपनगरे सर्व उपअधीक्षक, मुंबई शहर सर्व उपअधीक्षक यांच्या पथकातील ठाणे जिल्ह्यातील सर्व निरीक्षक विभागांच्या पथकांनी तसेच मुंबई उपनगरातील सर्व निरीक्षक विभाग आणि त्यांच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई केली. यामध्ये अलीमघर, दिवा, कुंभारली, वडूनवघर, पातळीपाडा, चिंचपाडा, कालवार केवणी, खर्डी, सरआंबे, छोटी खाडी अंजुरगाव, उत्तन, गोराई, टोकवडे, सावरणेगाव, मानेरेगाव, द्वारलीपाडा, वसारगाव अशा ४२ ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये १५ बेवारस तर १२ ठिकाणी वारसांवर कारवाई झाली. सुमारे दीड हजार लीटर गावठी दारु, ६० हजार १०० लीटर रसायन, पाच वाहने, एक हजार ५०० किलाे ग्रॅम काळा गुळ, ५० किलाे नवसागर, १३.५ बल्क लीटर बनावट विदेशी मद्य आणि ४६.८ बल्क लीटर बियर असा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.