- अजित मांडकेठाणे - जीएसटीसाठी केलेल्या अर्जातील त्रुटी दूर करून शो कॉज नोटीस न बजावण्यासाठी आणि जीएसटी नंबर करून देण्याचे आश्वासन देणाऱ्या आणि त्या पोटी २० हजारांची लाच मागणाऱ्या राज्य कर अधिकाऱ्यावर ठाणे लाच लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. राज्य कर अधिकारी मधुकर ढोक (५७) याला तडजोडीअंती ७ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे.
तक्रारदार २५ वर्षीय हे टॅक्स कन्सल्टंटचे काम करीत असून त्यांनी त्यांच्या ग्राहकाच्या रजिस्ट्रेशनसाठी अर्ज राज्य कर विभागाकडे केला होता. या अर्जावर कार्यवाही करण्यासाठी अर्ज राज्य कर अधिकारी ठाणे मधुकर ढोक (५७) यांच्याकडे सोपविण्यात आला. या प्रकरणात ढोक यांनी अर्जातील त्रुटी दूर करून, शो कॉज नोटीस न बजावण्यासाठी आणि जीएसटी नंबर करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार यासाठी तक्रारदाराकडून २० हजाराची लाच मागितली. मात्र रक्कम जास्त असल्याने तडजोडीअंती ७ हजाराच्या रक्कमेवर व्यवहार निश्चित झाला. दरम्यान तक्रारदाराने याबाबत ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार मंगळवारी दुपारी लाचलुचपत खात्याच्या अधिकारी आणि स्टाफ यांनी सापळा रचून राज्य कर अधिकारी ढोक याना अटक केली. त्यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.