डोंबिवली : देशातील पहिली रेल्वे १६५ वर्षांपूर्वी बोरीबंदर ते ठाणेदरम्यान धावली. याचा ८५ लाख उपनगरीय प्रवाशांना सार्थ अभिमान आहे. या ऐतिहासिक घटनेची माहिती पुढील पिढीला व्हावी, यासाठी त्या रेल्वेच्या इंजिनाची प्रतिकृती ठाणे स्टेशन परिसरात उभारण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी नुकतीच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. त्यास मान्यता दिली आहे. या कामाला लवकरात लवकर प्रारंभ करावा, अशी मागणी उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्था आणि ठाणे प्रवासी संघटनेने केली.रेल्वेचा प्रवास सुरक्षित व्हावा, अधिकाधिक सेवासुविधा मिळाव्यात तसेच पहिल्या इंजिनाची प्रतिकृती ठाणे स्थानक परिसरात उभारावी, अशी मागणी १० वर्षे केळकर करत आहेत. ही मागणी त्यांनी माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडेही केली होती. परंतु, अजूनही त्याची पूर्तता न झाल्याने त्यांनी पुन्हा गोयल यांचे लक्ष वेधले.भारतीय रेल्वे आणि ठाणे स्थानकाला १६५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने ठाणे रेल्वे प्रवासी व ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी फलाट क्रमांक-२ वर २४ तास वैद्यकीय सेवा सुरू झाली आहे. त्याचे उद्घाटनही विचारे यांच्या हस्ते झाले. रेल्वे आणि मॅजिक डील हेल्थ फॉर आॅल प्रायव्हेट लिमिटेड यांनी मध्य रेल्वेमार्गावरील २० स्थानकांत वैद्यकीय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी १२ स्थानकांत ही सेवा सुरू झाली आहे. परंतु, ठाणे स्थानकातील या प्रथमोपचार केंद्रास आवश्यक फार्मसी लायन्स न मिळाल्याने त्यास वेळ लागला. हे लायसन्स मिळाल्याने २४ तास वैद्यकीय सेवा मिळणारे ठाणे हे पहिले स्थानक ठरणार आहे. या केंद्रात औषधे कमी दराने मिळतील. त्याचबरोबर शुगर, ईसीजीचाचणी, डेंग्यूचाचणी, कोलेस्ट्रॉलचाचणी, नेब्युलायझर, ड्रेसिंग, रक्तदाबतपासणी मोफत केली जाणार आहे. त्याचा प्रवाशांना चांगला फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, रेल्वेतील वाढत्या अपघातांची केंद्र सरकारने नोंद घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी कल्याण-डोंबिवलीत निषेध आंदोलन करण्यात आले.केक कापून वाढदिवस साजराभारतीय रेल्वेचा १६५ वा वाढदिवस सोमवारी ठाणे स्थानकात केक कापून जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी ठाण्याचे खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, स्टेशनमास्तर महिदर, स्टेशन डायरेक्टर सुरेश नायर, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सर्व पदाधिकारी, नगरसेविका पल्लवी कदम, भास्कर पाटील, पवन कदम, रामभाऊ फडतरे, गिरीश राजे, रमाकांत पाटील, रोहित गायकवाड, हेमंत पमनानी, विभागप्रमुख प्रकाश पायरे, परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक, उपविभागप्रमुख मनोहर गिजे, राजू ढमाले, शाखाप्रमुख रमेश शिर्के, राजू मोरे, धोंडू मोरे, आजू देहेरकर आदी उपस्थित होते.
ठाणे स्थानकातील इंजिनाचा ‘तो’ प्रस्ताव कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 1:22 AM