नारायण जाधव ठाणे : विमानतळासारखी अभूतपूर्व रोषणाई, मॉल, चकाचक फलाट, सुसज्ज हॉटेल, कॅफेटेरियासह इतर ब्रॅण्डेड वस्तूंच्या दुकानांची साखळी लवकरच ठाण्यासह देशातील ६०० रेल्वे स्थानकांत पाहायला मिळणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात पाच हजार कोटी रुपये खर्चून १० रेल्वेस्थानकांचा विमानतळांच्या धर्तीवर विकास करण्यात येणार असून त्यात ठाणे स्थानकाचाही समावेश आहे. या सर्व रेल्वेस्थानकांचा पीपीपी तत्त्वावर विकास करण्यासाठी खासगी कंपन्यांनी पुढे यावे, याकरिता रेल्वेने त्यासाठीच्या अटी व शर्ती आणखी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, लीजचा कालावधी ३० वर्षांवरून ४५ वर्षे केल्यानंतर त्यात आणखी वाढ करण्याचा विचार सुरू झाला आहे.नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन्स कंपनी, इंडियन रेल्वेस्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसह खासगी कंपन्यांच्या सहकार्याने या ६०० रेल्वेस्थानकांचा सुसज्ज विकास करण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात ज्या १० रेल्वेस्थानकांचा विकास करण्यात येणार आहे, त्यात दिल्लीचे सराई रोहिला, लखनऊ, गोमतीनगर, कोटा, तिरुपती, नेल्लोर, एर्नाकुलम, पाँडिचेरी, मडगाव आणि ठाणे स्थानकाचा समावेश आहे. या स्थानकांचे काम डिसेंबरअखेरपर्यंत सुरू करण्याचा रेल्वेचा मानस असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.मात्र, ठाणे स्थानकाचा विकास करताना तो सध्याच्या ब्रिटिशकालीन स्थानकाचा होणार की विस्तारित नव्या स्थानकाचा होणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु, जाणकारांच्या अंदाजानुसार मनोरुग्णालयाच्या जागेवरील नव्या विस्तारित ठाणे स्थानकाचाच या प्रकल्पात समावेश असावा, असा अंदाज आहे.देशातील प्रमुख स्थानकांचा विमानतळासारखा सुसज्ज विकास करावा, असा विचार सर्वप्रथम २०१५ मध्ये रेल्वे मंत्रालयात चर्चेला आला. परंतु, त्यासाठी निधी कोठून आणणार, हा मोठा प्रश्न होता. परंतु, तो खासगी विकासकांच्या सहकार्यातून पीपीपी तत्त्वावर करावा, असा एक विचार पुढे आला. परंतु, त्यानंतरही रेल्वेच्या जाचक अर्टी व शर्ती पाहता कोणी विकासक पुढे येत नसल्याचे पाहून आता या अटी व शर्ती शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, रेल्वेस्थानकाचा भूखंड लीजवर देताना तो ३० ऐवजी ४५ वर्षांकरिता द्यावा, असे मागे ठरले होते. परंतु, त्यात आता वाढ करण्याचे घाटत आहे. लीजचा कालावधी वाढवून दिल्याने विकासकास त्याने खर्च केलेले पैसे वसूल करण्यास मदत होईल, असे आता सांगण्यात येत आहे.नवीन रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी तयार करण्यात आलेल्या ११९ कोटी रु पयांच्या आराखड्यास रेल्वे विभागाने काही महिन्यांपूर्वी मंजुरी दिली होती.यामध्ये नव्या स्थानकापर्यंत जाणाऱ्या मार्गिका, तिथल्या प्रवासी सेवा, वाहनांसाठी पूल आणि विद्युत व्यवस्था अशा कामांचा समावेश आहे.याच कामांसाठी निविदा काढण्यात येणार असून ही कामे स्मार्ट सिटीच्या निधीतून केली जाणार असल्याचे ठाणे महापालिकेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. नवीन स्थानकासाठी आवश्यक असलेल्या मनोरु ग्णालयाच्या जागा हस्तांतराबाबत आरोग्य विभागाने यापूर्वीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. ही जागा ताब्यात आल्यानंतर प्रत्यक्षातील कामासाठी निविदा प्रक्रि या करावी लागणार आहे.
ठाणे स्थानकही चकाकणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 2:03 AM