लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत होता. परंतु, आता ठाणे महापालिकेकडे उपलब्ध असलेला सगळाच साठा संपला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिकडे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत खासगी कोविड रुग्णालयांना मागणीनुसार त्याचा रोजच्या रोज पुरवठा केला जात आहे. त्यानुसार आतापर्यंत ११ हजार ६२३ रेमडेसिविरचा साठा देण्यात आल्याची जिल्ह्याधिकारी कार्यालयाने दिली. मागणी पेक्षा अर्धाच साठा उपलब्ध होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली, तर आमच्याच्या कोविड सेंटरमध्ये दाखल रुग्णांसाठी मात्र आता एकही रेमडेसिविर नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.
रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाइकांना हे इंजेक्शन आणण्यासाठी सांगितले जात आहे. त्यामुळे ते मिळविण्यासाठी नातेवाइकांची तारेवरची कसरत सुरू आहे. परंतु, या इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी शासनाने रुग्णालयातील मेडिकलमधूनच रेमडेसिविर विकले जाणार नसल्याचे सांगितले होते. तसेच रुग्णाला रेमडेसिविर लागले तर रुग्णालयांनी ते उपलब्ध करून द्यावे, असेही स्पष्ट केले होते. त्यानंतर यावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालयांना रेमडेसिविरचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार रोजच्या रोज मागणीपेक्षा अर्धाच पुरवठा होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. त्यानुसार मागील चार दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयाने ११ हजार ६२३ रेमडेसिविरचा पुरवठा केल्याचे सांगण्यात आले. रोजच्या रोज येणाऱ्या पुरवठ्यानुसार ते रुग्णालयांना पुरविले जात असल्याचेही जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे ठाणे महापालिकेकडे सोमवारी केवळ २०० रेमडेसिविर शिल्लक राहिल्या होत्या. १८ एप्रिलपर्यंत उपलब्ध साठा मिळेल, अशी आशा होती. परंतु, महापालिकेची ही आशा फोल ठरली आहे. तारीख उलटूनही अद्यापही एकही रेमडेसिविरचे इंजेक्शन मिळाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यातही ग्लोबल रुग्णालयातही आता एकही रेमडेसिविर नसल्याची माहिती पालिकेने दिली आहे. याठिकाणी सध्या तब्बल ९५० रुग्णांवर उपचार सुरू असून, साठा संपल्याने आता पुढे काय करायचे असा पेच महापालिकेपुढे निर्माण झाला आहे. तो मिळावा म्हणून पालिका जास्तीचे पैसे मोजण्यासही तयार झाली आहे. परंतु, अद्यापही हा साठा उपलब्ध होऊ शकलेला नसल्याने रुग्णांना आता दुसरे कोणते मेडिसिन किंवा इंजेक्शन द्यावे, असा पेच सतावू लागला आहे.
ठाणे महापालिकेला १८ एप्रिलपर्यंत पुरेसा रेमडेसिवरचा साठा मिळेल अशी आशा होती. परंतु,मागणी करूनही अद्यापही तो उपलब्ध होऊ शकलेला नाही. त्यामुळे आता इतर कोणता पर्याय उपलब्ध होतो का? याची चाचपणी सुरु आहे. तसेच रेमडेसिविरचा साठा लवकर उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे.- संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा