ठाणे : दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक बाहेर पडल्यामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती. याचाच परिणाम शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्ग आणि घोडबंदर रोडसह अंतर्गत रस्त्यांवर झाल्याने शहरात वाहतूककोंडीचे चित्र दिवसभर पाहण्यास मिळाले. त्यातच, १० मिनिटांचे अंतर कापण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत होता. तसेच मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी गोडाउनमधून अवजड वाहने अचानक बाहेर पडल्याने याचा फटका त्या मार्गावरील वाहनांना बसला तसेच विटावा येथील सब-वेमध्ये पाणी साचल्याने त्या परिसरात कोंडीचे चित्र दिसत होते.
दिवाळीच्या खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन तसेच येथील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने २५ ते २९ आॅक्टोबर असा वाहतूकबदल सुचवला असून दुचाकी वगळता इतर वाहनांना बाजारपेठेत बंदी घातली आहे. मात्र, दुपारपर्यंत वाहतूक शाखेने काढलेल्या अधिसूचनेनुसार बदल दिसून येत नव्हता. त्यामुळे बाजारपेठेत नागरिकांसह वाहनांच्या गर्दीने ठाणे रेल्वेस्थानक परिसरासह तलावपाळी, कोर्टनाका, टॉवरनाका, जांभळीनाका आदी परिसरांसह नौपाड्यातील गोखले रोड येथे वाहतूककोंडीचे चित्र पाहण्यास मिळाले.
ठाणे-बेलापूर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे येथील वाहतुकीचा वेग मंदावला होता. तसेच कळवानाका ते नवी मुंबईतील दिघापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनचालकांचे हाल झाले. भिवंडीतही वाहतूककोंडीचा फटका वाहनचालकांना बसला. दिवाळी असल्याने भिवंडीतील गोदामामध्ये वस्तूंची नेआण करण्यासाठी अवजड वाहनांची वर्दळ सुरू होती. त्यातच, मानकोली येथे दोन अवजड वाहने रस्त्यात बंद पडल्याने वाहतुकीत आणखी भर पडली होती. यामुळे मानकोली ते रांजनोलीनाक्यापर्यंत दोन्ही मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ही वाहने धीम्या गतीने धावत असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.