- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने ठाण्यात दुसरे ठाणे विद्यार्थी पक्षिमित्र संमेलन ८ डिसेंबर रोजी आयोजिले आहे. पक्षी या विषयावर विविध स्पर्धा, बीएनएचएसचे डॉ. राजू कसंबे यांची प्रमुख उपस्थिती आणि शहरातील पक्ष्यांची ओळख, त्यांची माहिती हे या संमेलनाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना पक्ष्यांची ओळख व्हावी, त्यांच्याविषयी माहिती असावी, यासाठी जिज्ञासा ट्रस्ट, पर्यावरण दक्षता मंडळ, होप, फर्न, यूबीसीजी या पाच संस्थांच्या वतीने हे संमेलन आयोजित केले आहे. गेल्या वर्षी या संमेलनास सुरुवात झाली. त्यावेळी १४ शाळांतून ६५ विद्यार्थी सहभागी झाले होते. या संमेलनाला आतापर्यंत १४ शाळांच्या ९० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. १०० विद्यार्थी या संमेलनात सहभागी होतील, असा मानस संमेलनाचे मुख्य आयोजक रवींद्र साठ्ये यांनी व्यक्त केला.
संमेलनाच्या सुरुवातीला पक्षी या विषयावर तीन स्पर्धा होणार आहेत आणि त्यानंतर डॉ. कसंबे यांच्या हस्ते या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे. या स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना रविवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेचर ट्रेलसाठी नेण्यात येणार आहे. या संमेलनात शहरात आढळणाऱ्या पक्ष्यांची माहिती व्हावी, यासाठी स्लाइड शोदेखील आयोजित केला आहे. डॉ. कसंबे यांचे ‘पक्षी जगतातल्या अद्भुत गोष्टी’ यावर व्याख्यान होणार आहे. संमेलनाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढल्यास भविष्यात, जिल्हास्तरावर हे संमेलन आयोजित केले जाईल, असे साठ्ये यांनी सांगितले.‘बी अ बर्ड’ स्पर्धेचे आयोजनपक्षी या विषयावर चित्रकला आणि कोणत्याही आवडीच्या पक्ष्यावर पीपीटी सादरीकरण या स्पर्धा होणार असून यंदा प्रथमच ‘बी अ बर्ड’ म्हणजेच पक्षी बना, ही स्पर्धा आयोजित केली आहे. पक्ष्याच्या वेशभूषेत येऊन त्या विद्यार्थ्याने त्या पक्ष्याची नक्कल करायची आहे, असे या स्पर्धेचे स्वरूप आहे. ही स्पर्धा गमतीशीर ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी या शैक्षणिक वर्षांत १५ शाळांमध्ये पीपीटीद्वारे पक्ष्यांची ओळख आणि पक्षी निरीक्षणाची माहिती देण्यात आली होती.