- सुरेश लोखंडे ठाणे - जिल्ह्यातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी शहापूर तालुक्यातील सावराेली बु. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या सत्राची परीक्षा संपल्यानंतर विविध झाडांच्या बिया, माती, शेणखतापासून तब्बल २० हजार सीड बाॅल तयार करण्याचा अनाेखा उपक्रम यशस्वीरित्या राबवला आहे. विविध झाडांच्या बियांचे हे सीड बॉल कृषी दिनी शहापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) भाऊसाहेब रेंगडे यांच्या हस्ते ठिकठिकाणी मातीत टाकले आहे.
जिल्हा परिषदेच्या या शाळेत ७४ विद्यार्थी पटसंख्या आहे. या विद्यार्थ्यांना निसर्गा विषयी प्रेम आत्मीयता जागृत करणे. पर्यावरण आणि मनुष्य यांचा सहसंबंधाची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाची संकल्पना शाळेच्या शिक्षिका पूनम उबाळे यांनी राबवून त्यास विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. शाळा सुरू झाल्यावर गटागटा मधून सीड बॉल जमा करण्यात आले असून सर्वाधिक सीड बॉल बनवणाऱ्या गटाला बक्षीस देऊन गौरवण्यात आले आहे. र्या उपक्रमासाठी बीडीओंसह गट शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, विस्तार अधिकारी डॉ. प्राजक्ता राऊत, केंद्रप्रमुख मनीषा जटाळ, वनक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक मनोज गोंधळी, सहशिक्षक अरुणा शेलार, विजय उदार, सरपंच रोहन चौधरी, उपसरपंच शुभम चाभरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बेबी सोंगाळ आणि सर्व पालक, ग्रामस्थांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले आहे.