- जितेंद्र कालेकरठाणे - महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या स्थापना दिनानिमित्त (रेजिंग डे) गुरुवारी ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने वाहतूक नियमांचे चालकांनी पालन करण्यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत ५० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदविला होता.
रेजिंग डे निमित्त वाहतूक नियंत्रण शाखेच्या वागळे इस्टेट युनिटने ५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास आयोजन केले होते. या रॅलीत विद्यार्थ्यांनी वाहतूकीचे नियम पालनाचे, दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालण्याचे, सीट बेल्ट घालण्याचे आणि सिग्नल न तोडण्याचे आवाहन करणारे फलक हाती घेऊन सहभाग घेतला. रघुनाथ नगर येथील आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयापासून ते मर्फी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), एलआयसी कार्यालयापर्यंत तसेच आरटीओ कार्यालय ते रघुनाथनगर या मार्गावरुन ही रॅली काढण्यात आली होती. वागळे इस्टेट युनिटच्या पोलिस निरीक्षक चेतना चौघरी यांच्यासह अंमलदार आणि वाहतूक मदतनीसही या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.