ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 8 - एमएमआर प्रदेशातील वेगवान वाहतुकीसाठी रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याची आवश्यकता असून मोटागाव-माणकोली खाडी पूल तसेच, दुर्गाडी खाडी पुलाच्या मार्गातील अडचणी तातडीने दूर करून या कामांना गती द्यावी लागेल, असे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी भिवंडी येथे माणकोली पुलाच्या उद्घाटनप्रसंगी केले. वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचे काम देखील तातडीने पूर्ण करण्याकरता नॅशनल हायवे ऑथॉरिटीसोबत बैठक आयोजित करण्याची विनंती श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. त्यावर, हे सर्व प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याकरता सरकार प्रयत्नशील असून पालकमंत्री शिंदे यांच्या सूचनांनुसार तातडीने पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी दिले.
एमएमआरडीएच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या माणकोली पुलाच्या उजव्या बाजूच्या मार्गिकेचे उदघाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री श्री. शिंदे यांच्यासह राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील,आमदार शांताराम मोरे, किसान कथोरे,गणपत गायकवाड, नरेंद्र पवार, महेश चौघुले, ‘एमएमआरडीए’चे आयुक्त यू पी एस मदान आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
मोटागाव-माणकोली खाडीपुलासाठी अधिग्रहित करावी लागणारी जमीन सीआरझेडमध्ये असून त्यामुळे नुकसान भरपाईच्या संदर्भात अडचणी निर्मात होत असल्याकडे श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. डोंबिवलीहून ठाणे अथवा मुंबईला थेट जाण्यासाठी हा पुल अत्यंत गरजेचा असून त्यामुळे या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी उच्चस्तरीय बैठक लावण्यात यावी, असे श्री. शिंदे म्हणाले. तसेच, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोमध्ये कल्याण पश्चिमेचा भाग रिक्त राहात असून संपूर्ण कल्याण शहराचा मेट्रोमध्ये समावेश व्हावा, याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संपूर्ण एमएमआर क्षेत्रासाठी मेट्रोचे सादरीकरण केले होते. त्यानुसार या मेट्रोमार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देशही आपण एमएमआरडीएला दिले होते, अशी आठवणही श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना यावेळी करून दिली.
यावर बोलताना दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनला यासंदर्भात आदेश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.