ठाणे : एक महिन्यापूर्वी नव्याने दाखल झालेल्या ई-शिवनेरी या लालपरीला आता ठाणे- स्वारगेट प्रवासी असलेल्या ठाणेकरांनी मोठी पसंती दिली आहे. टप्प्याटप्प्याने दाखल झालेल्या ठाणे- स्वारगेट या मार्गावरील १२ ई-शिवनेरी बसपैकी आठ बसमधून गारेगार प्रवासाचा अनुभव सुमारे १२ हजार प्रवाशांनी घेतला आहे. त्यातून ७३ लाखांहून अधिक रुपयांचे उत्पन्न महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तिजोरीत जमा झाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
साधी, निमसाधी, शिवनेरी, शिवशाही, स्लीपर कम सीटर यासारख्या डिझेलवर धावणाऱ्या एसटी बस पाठोपाठ आता इलेक्ट्रिक बस असलेली ई-शिवनेरी या नावाची आधुनिक बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्यानुसार ठाणे विभागामार्फत केलेल्या मागणी अनुसरून टप्प्याटप्प्याने एकूण १२ गाड्या आतापर्यंत दाखल झाल्या आहेत.
दाखल झालेल्या गेल्या महिन्यापासून आठ गाड्यांनी ठाणे - स्वारगेट या मार्गावर एकूण ५८९ यशस्वी फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. या फेऱ्यांच्या माध्यमातून एकूण ९१ हजार ५५२ किलोमीटरचे अंतर या गाड्यांनी कापले आहे. त्यातून ७३ लाख ३९ हजार ७६८ रुपये उत्पन्न ठाणे विभागाला मिळाले आहे.
विविध योजनांचा फायदाशासनाने राबविलेल्या विविध योजनांमुळे तोट्याचे रूपांतर नफ्यात झाले आहे. मे महिन्यात ठाणे विभागातील ठाणे-१ ला सुमारे १६ लाख ८० हजार रुपयांचा नफा झाला. त्याचप्रमाणे भिवंडी - २० लाख १३ हजार, शहापूर - ४ लाख ६२ हजार तर कल्याण आगाराला ३९ लाख ६५ हजारांचा नफा झाला आहे.
ठाणे- भाईंदर मार्गावर लवकरच बसनव्या कोऱ्या ई- शिवनेरीतून महिन्याभरात ११ हजार ८७१ प्रवाशांनी सुखरूप आणि गारेगार प्रवासाचा आनंद लुटला आहे. आता १२ ई- शिवनेरी बस ठाणे - स्वारगेट मार्गावरील प्रवाशांसाठी धावत आहेत. भविष्यात अशाप्रकारच्या ई-शिवनेरी बस ठाणे- भाईंदर या मार्गावर धावताना दिसतील, अशी माहिती ठाणे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.