प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कोची केरळ येथील पेरियार नदीत लांबपल्ल्याच्या जलतरण स्पर्धेत भारत मलेशिया, थायलंड, श्रीलंका या देशातील जलतरणपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेत १६ किमी स्पर्धेत स्टारफिश फाऊंडेशनच्या मानव मोरे याने १८ वर्षावरील गटात, १० किमी स्पर्धेत १८ वर्षाखालील मुलांच्या गटात कैवल्य राणे, ६ किमी स्पर्धेत मुलीच्या १८ वर्षांखालील गटात आयुषी आखाडे हिने तर ४०० मीटर संपूर्ण स्पर्धेत शर्वण पेठे या ठाणेकरांनी प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेसाठी १६ किमी, १० किमी, ६ किमी, २ किमी, ४०० मीटर अशा विविध अंतरांमध्ये या स्पर्धेत ४ देशांतील ६१० स्पर्धकांचा समावेश होता. यात ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाऊंडेशनचे ११ जलतरणपटू सहभागी झाले होते. १६ किमी संपूर्ण मुलांच्या गटात आयुष तावडे याने तृतीय क्रमांक व सोहम पाटील याने चौथा क्रमांक, १६ किमी मुलींच्या संपूर्ण गटात स्नेहा लोकरे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच, संपूर्ण १० किमी स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. १० किमी मुलींच्या गटात श्रृती सचिन जांभळे हिने चौथा क्रमांक तर १२ वर्षाखालील गटात किमया गायकवाड हिने द्वितीय, २ किमी मुलांच्या स्पर्धेत ओजस मोरे याने चौथा तर मुलींचा १२ वर्षाखालील गटात माही जांभळे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. हे सर्व जलतरणपटू प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे धडे घेत आहे.