अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : हवामान खात्याने पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याची अनुभूती ठाण्यात सोमवारपासूनच जाणवू लागली. सोमवारी ठाणे शहरातील तापमानात वाढ होवून पारा ४१.६ अंश सेल्सियसवर पोहोचला होता. वाढलेल्या तापमानामुळे ठाणेकरांच्या अंगाची लाहीलाही होवू लागली होती. तसेच पुढील काही दिवस उष्णतेचा पारा वाढणार असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने रविवारी पुढील पाच दिवसांसाठी तापमानाचा अंदाज जारी केला. कोकण विभागात सोमवार ते बुधवार या कालावधीत कमाल तापमानाचा पारा ३ ते ४ अंशांनी वाढून, उष्णता निर्देशांक ४० ते ५० अंशांदरम्यान जाणवू शकेल, असेही स्पष्ट केले. आर्द्रता आणि उष्णता यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा तापमानाची जाणीव अधिक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोमवारी सकाळी ११ नंतर वातावरणात उष्णता वाढण्यास सुरुवात झाली होती. त्यात हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाची अनुभूती सोमवारी ठाणेकरांना आली. ठाणे शहरातील तापमान ४१.६ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले. या वाढलेल्या तापमानामुळे ठाणेकरांच्या अंगाची लाहीलाही होवू लागली होती. रस्त्यावरून पायी चालणाऱ्या नागरिकांनी डोक्यात टोपी, तर, काहींनी छत्री घेवून बाहेर पडण्याच्या निर्णय घेतला. तर, अनेकांनी थंड पेयच्या गाड्यांवर आपला मोर्चा वळविला असल्याचे दिसून आले.
दरम्यान, या वाढत्या तापमानाने ठाणेकर नागरिकांनी घर आणि ऑफिस मधील एसीत बसून थंडगार हवेत राहणाने जास्त पसंत केले. वातवरणातील वाढत्या उन्हाच्या काहीलीमुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
उन्हापासून बचावासाठी काय काळजी घ्याल?
१. पुरेसे पाणी प्या, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव्य पदार्थ घ्या.२. शक्यतो तीव्र उन्हात दुपारी १२ ते ४ या वेळात घरात राहावे.३. सैलसर व सुती कपडे वापर करणे, शक्यतो पांढरे कपडे वापरावेत. ४. डोक्यावर टोपी रुमाल किंवा छत्री वापरावी.५. थेट येणाऱ्या सूर्यप्रकाशाला उन्हाला अडवावे व वातावरण थंड राहिल यासाठी पंख्याचा वापर करण्यात यावा.६. गर्भवती स्त्रिया, वैद्यकीय समस्या असणाऱ्या कामगारांनी उन्हात काम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.