- सुरेश लोखंडेठाणे - येथील जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि एमसीएचआयच्या बेस्ट सोसायटी स्पर्धेमध्ये विजेत्या ठरलेल्या गृहसंकुलांचा सोमवारी आमदार संजय केळकर यांच्याहस्ते पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ठाणे शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण व्हावी, स्वच्छतेत ठाणे शहराचा नावलौकिक व्हावा, या हेतुने ही स्पर्धा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी आयाेजित केली असता त्यात तबबल १० साेसायट्या बेस्ट साेसायटी स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वच्छता अभियानाला अनुसरून ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि एमसीएचआयच्यावतीने बेस्ट गृहनिर्माण संस्थे बरोबरच स्वच्छतेला प्राधान्य देऊन ठाणे जिल्हयातील सोसायट्यांसाठी स्पर्धा घेण्यात आली होती. नुकत्याच पार पडलेल्या एमसीएचआय गृहप्रदर्शनात ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील विजेत्या सोसायट्यांचा पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेत ठाण्यातील श्रवण एबी सोसायटीने प्रथम क्रमांक, द्वितिय रुस्तुमजी अजिनो एबीसी सोसायटी तर, तृतिय क्रमांक शुभारंभ फेज २ सोसायटीने पटकाविला.. याप्रमाणेच मोहन हायलँड, स्वस्तिक पाल्म सोसा. फेरीटेल टी वन, रहेजा गार्डन, दोस्ती ग्रेशिया आदी सात विजेत्या सोसायट्यांनाही यावेळी गौरविण्यात आले. याप्रसंगी, कोकण विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव, जिल्हा उपनिबंधक डॉ.किशोर मांडे, उपनिबंधक डॉ.अविनाश भागवत, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे आदी उपस्थित होते.