डोंबिवली : अंबरनाथ रेल्वेस्थानकात सकाळी ८:४१ वाजता एक जण फलाट क्रमांक दोनवरून फलाट क्रमांक तीनवर रुळावरून जात असताना सुसाट जाणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसखाली येऊन त्याचा मृत्यू झाला. छिन्नविछिन्न झालेला मृतदेह पोलिसांनी छाया रुग्णालयात नेला. मृतदेहाच्या खिशातून पोलिसांना एक पाकीट मिळाले. त्यात पोलिस प्रदीप सुरेश सोनवणे यांचे पॅनकार्ड मिळाले. त्यामुळे हा मृतदेह सोनवणे यांचा असल्याचा निष्कर्ष काढून सव्वादहा वाजता कल्याण रेल्वे पोलिसांत अपमृत्यूची नोंद करण्यात आली.
ही बातमी कळताच सोनवणे यांच्या कुटुंबावर तर आभाळच कोसळले. काहींनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. दुपारनंतर जेव्हा सोनवणे यांच्यापर्यंत त्यांच्याच श्रद्धांजलीचे मेसेज पोहोचले तेव्हा, त्यांना धक्का बसला. सकाळी अंबरनाथ स्टेशनमध्ये रेल्वेत चढताना आपले पाकीट मारले गेले. पाकीटमारी करणाऱ्या चोरट्याचा अपघातात मृत्यू झाला असून, आपण जिवंत असल्याचा खुलासा सोनवणे यांनी केला. आगरी पाडा येथे ड्यूटीवर जात असताना प्रदीप सुरेश सोनवणे यांचे पाकीट अंबरनाथ रेल्वेस्थानकात गर्दीचा फायदा घेत मारले होते.
...आणि सत्य उजेडात आले या अपघातामुळे कल्याण लोहमार्ग पोलिसांची बुधवारी सकाळपासून दुपारपर्यंत तारांबळ उडाली. सोनवणे यांनी व्हायरल केलेल्या संदेशानंतर सत्य उजेडात आले. सोनवणे यांनी संदेशात म्हटले आहे की, ते प्रदीप सुरेश सोनवणे, आगरी पाडा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असून बुधवारी सकाळी दिवस पाळीवर जात असताना अंबरनाथ स्टेशन येथे आले. तेथून अंबरनाथ ते भायखळा प्रवासासाठी सकाळी ७:५१ वाजताची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल पकडत असताना त्यांचे पाकीट मारले गेले; परंतु लोकल सुरू झाल्याने त्यांना ट्रेनमधून उतरता आले नाही. ते पुढे निघून गेले.
मेसेजने मानसिक त्रासआपण सुरक्षित असून, आगरीपाडा पोलिस स्टेशन येथे ड्यूटीवर आहे. वरचेवर येणाऱ्या मेसेजमुळे आपल्याला मानसिक त्रास होत असून कोणीही माझ्या नावाचे चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.
अंबरनाथमध्ये झालेल्या रेल्वे अपघातात मरण पावलेल्या अनोळखी व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. सोनवणे यांचे पॅनकार्ड असलेले पाकीट त्या व्यक्तीकडे सापडल्याने गोंधळ झाला.- वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कल्याण लोहमार्ग पोलिस ठाणे