- सदानंद नाईक उल्हासनगर - महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते १५ दिवसांपूर्वी उदघाटन झालेल्या छत्रपती संभाजी चौकातील प्राथमिक आरोग्य केंद्राला पावसाने गळती लागली. या गळतीमुळे केंद्रात पाणीच पाणी झाले असून औषधी व इतर साहित्य भिजण्याची भीती व्यक्त होत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४, छत्रपती संभाजी चौकातील एका जुन्या समाजमंदिरावर लाखो रुपये खर्चून नूतनीकरण केले. त्याठिकाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी गेल्या १२ जुलै रोजी आयुक्त अजीज शेख, उपायुक्त सुभाष जाधव यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राचे उदघाटन झाले. यावेळी प्रभारी जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, आयुष्मान आरोग्य मंदिर-नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरसह कर्मचारी, नागरिक आदीजन उपस्थित होते. मात्र उदघाटनाच्या अवघ्या १५ दिवसात आरोग्य केंद्राला पावसाळ्यात पाणी गळती लागल्याने, औषधी व इतर साहित्य भिजण्याची भीती व्यक्त होत आहे. केंद्राच्या स्लॅबला गळती लागून केंद्रात पाणी झाले. या पाण्यात रुग्णांवर उपचार करण्याची वेळ डॉक्टरसह कर्मचाऱ्यांवर आली. समाजसेवक प्रशांत चंदनशिवे यांनी आरोग्य केंद्राच्या पाणी गळतीबाबत लेखी निवेदन महापालिकेला देऊन गळती थांबविण्याची विनंती केली आहे.
महापालिका बांधकाम विभागाचे अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांनी आरोग्य केंद्राच्या गळती बाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तसेच केंद्राला स्वतः भेट देणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त गवस म्हणाले. तर वैद्यकीय अधिकारी डॉ मोहिनी शर्मा यांनी छत्रपती संभाजी चौकातील आरोग्य केंद्राला लागलेल्या गळती बाबत तक्रारी आल्याचे सांगून याबाबत बांधकाम विभागाला माहिती दिल्याचे सांगितले. आरोग्य केंद्राच्या पाणी गळतीने आरोग्य केंद्राच्या इमारती बाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.