- प्रज्ञा म्हात्रेठाणे - ढोल ताशांचा गजर, सायकल रॅली, पारंपारिक वेशभूषा, रांगोळ्यांच्या पायघड्या, जिम्नॅस्टिकची प्रात्यक्षिके, बाईक रॅली, ६० संस्थांचा सहभाग, घोडा गाडी, अबालवृद्धांचा, पोलीसांचा सहभाग, श्री कौपिनेश्वर महाराज की जय, हर हर महादेव, जय श्रीराम जय घोषणा अशा वातावरणात गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली नववर्ष स्वागतयात्रा संपन्न झाली.
श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासच्यावतीने मंगळवारी ठाणे शहरामध्ये या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. श्री कौपिनेश्वर मंदिर येथून कौपिनेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले. सुरुवातीला या पालखीचे भोई भाजपाचे आ. संजय केळकर, स्वागताध्यक्ष अर्जुन देशपांडे, न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर पालखी श्री सिद्धिविनायक मंदिर येथे आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आणि ते पालखीचे भोई झाले. दरम्यान, तेथे पालखीची आरती करण्यात आली. शिंदे यांनी पालखी खांद्यावर घेतल्यावर त्यांनी देखील ‘हर हर महादेव’ अशा घोषणा दिल्या.
चिंतामणी चौकात आल्यावर मुख्यमंत्री शिंदे, आ. केळकर, स्वागताध्यक्ष देशपांडे यांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर एकेक राजकीय पदाधिकारी या स्वागतयात्रेत सहभागी होत गेला. चिंतामणी चौकाच्या इथून दगडी शाळेच्या चौकात पालखी आल्यावर त्याचे रुपांतर स्वागतयात्रेत झाले. यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा दाखविण्यात आला. गोखले रोड येथे शिंदे गटाच्यावतीने पुष्पवृष्टीचे आयोजन करण्यात आले होते. येथे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी पालखी आणि नववर्ष स्वागतयात्रेवर पुष्पवृष्टी करुन सर्वांना मिठाईचे बॉक्स वाटले. जाणता राजामधील छत्रपती शिवाजी महाराज साक्षात अवतरले होते. नौपाडा पोलिस स्टेशन पालखी आल्यावर पोलीसांनी या पालखीचे पूजन केले.