ठाणे - मे महिना सुरु होण्याआधीच ठाण्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. मार्च महिन्यातच सोमवारी तापमानाने मागील वर्षीचा उंचाक गाठला असून उन्हाचा पारा थेट ४१ अंश सेल्सीअसवर गेल्याचे दिसून आले. अंगाची लाहीलाही झाली नसली तरी उन्हाचे चटके मात्र सहन करावे लागते होते.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यातच उन्हाचा पारा अधिक वाढत असल्याचे पालिकेच्या प्रदुषण नियंत्रण कक्षाने जारी केलेल्या आकडेवारीवरुन दिसून आले आहे.
१ मार्च रोजी ठाण्यात उन्हाचा पारा हा ४०.९ अंश सेल्सीअस एवढा होता. त्यानंतर सोमवारी म्हणजेच १२ मार्च रोजी उन्हाचा पारा हा थेट ४१ अंश सेल्सीअसवर गेल्याचे दिसून आले. मागील दोन आठवड्यात ठाणे शहराच्या तापमानात कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. २४ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत शहराचे तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे होते. २५ फेब्रुवारीला ३७.०९ अंश सेल्सिअस २६ तारखेला ३९ .०५, २७ तारखेला ४०.१ २८ ला ४०.९, १ मार्चला ४०.९, २ तारखेला ३९.७,३ मार्चला ३९.०५, ४ मार्चला ३९.८, ०५ मार्च ३७. ४, ६ तारखेला ३८. ४, ७ ला ३८. ९, ८ मार्च ३७ . ८, ९ मार्च ३६. ३, १० तारखेला ३८ . ८, ११ मार्च ३८. २ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर रात्रीचे तापमान हे सरासरी २४ अंश सेल्सीअसच्या आसपास होते. यापूर्वी ठाणे शहरात फेब्रुवारी २०१७ मध्ये ४३.३ अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. तर एप्रिल २०१६ मध्ये ४१.४ अशं सेल्सीअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर यावर्षी २८ फेब्रुवारी आणि १ मार्चला ४०.०९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. परंतु सोमवारी अर्थात १२ मार्च रोजी शहराचे तापमान हे ४१ अशं सेल्सीअसवर गेल्याचे दिसून आले. वाढत्या तापमानामुळे आजाराचे प्रमाण देखील वाढण्याची शक्यता आता र्वतविली जात आहे. त्यामुळे नागरीकांनी याची काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.