ठाणे: एरव्ही, घराच्या आवारात लावलेली मोटारसायकल चोरीस गेल्यानंतर दुचाकीचे मालक पोलिसांकडे तक्रार करतात. पण, वाहतूक नियंत्रण शाखेने जप्त केलेली मोटारसायकलच वागळे इस्टेट वाहतूक विभाग कार्यालय आवारातून चोरीस गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक अशोक कुंभार यांनी सोमवारी तक्रार दाखल केली आहे.ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वागळे इस्टेट उप विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक कुंभार यांच्या पथकाकडून नितीन कंपनीजवळ ड्रंक अॅन्ड ड्राइव्ह विरुद्ध ९ मार्च रोजी कारवाई सुरु होती. त्यावेळी सायंकाळी ६ वा. च्या सुमारास लोकमान्यनगर येथे राहणारा गणेश चव्हाण याला मद्यप्राशन करुन मोटारसायकल चालवितांना त्यांनी पकडले होते. त्यावेळी त्याची मोटारसायकल जप्त करुन त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. त्यानंतर तो गाडी सोडविण्यासाठी न्यायलयातही गेला नाही आणि वाहतूक विभागाकडेही त्याने संपर्क साधला नाही. दरम्यान, त्याची मोटारसायकल नितीन कंपनी येथील ब्रिजच्या खाली वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोरच लोखंडी साखळीला कुलूप लावून पोलिसांनी ठेवली होती. अगदी अलिकडेच पोलिसांच्या पाहणीमध्ये ती चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी पुन्हा चव्हाणकडे संपर्क साधला. मात्र, गेले दीड महिना गावी असल्याचे त्याने सांगितले. आता जप्तीमधील मोटारसायकलच चोरीस गेल्याने पोलिसांच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक कुंभार यांनी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात २७ मे रोजी चोरीची तक्रार दाखल केली आहे. आता मोटारसायकलची चोरी कोणी केली, याचा सर्व बाजूंनी तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वाहतूक विभागाच्या ताब्यातील मोटारसायकलीची ठाण्यातून चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 8:17 PM
ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह प्रकरणात ठाण्याच्या वागळे इस्टेट वाहतूक उपशाखेने जप्त केलेली मोटारसायकलच पोलिसांच्या ताब्यातून चोरीस गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनीच नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
ठळक मुद्दे ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह मोहीमेच्या वेळी जप्त केली होती मोटारसायकल वागळे इस्टेट विभागाची कारवाईजप्तीची मोटारसायकल गायब झाल्याने उडाली खळबळ