- सुरेश लोखंडे ठाणे - जिल्हा परिषदेच्या मार्फत केंद्र पुरस्कृत योजना व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेद्वारे आजपर्यंत १३ हजार ५३८ ग्रामीण कुटुंबियांना त्यांचे हक्काचे घर मिळाले आहे,असे ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यात पंतप्रधान आवास, रमाई, शबरी, आदिम, मोदी घरकुल योजनाच्या माध्यमातून आदिवासी, अनुसूचित जाती जमातीतील गोरगरीब, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील आर्थिक, दुर्बल घटकांना पक्क्या घरासाठी अर्थसहाय्य दिले जाते. त्यामुळे ठाणे ग्रामीण भागातील १३ हजार ५३८ गोरगरीब कुटुंबियाना त्यांच्या स्वप्नाचे घर मिळवता आले आहे.
त्यासाठी केंद्र पुरस्कृत योजना व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांची यशस्वी अंमलबजावणी होत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे यांनी दिली. केंद्र पुरस्कृत घरकुल योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण अंतर्गत २०१६-१७ ते २०२१ -२२ यावर्षात न ऊ हजार ५३५ घरकुल ठाणे जिल्ह्यात मंजूर झाली होती . त्यापैकी आठ हजार ९४६ घरकुल पूर्ण करण्यात यश मिळाले असून ९३ टक्के काम पूर्ण झाले आहे. शिल्लक ५८९ घरकुल लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मार्फत करण्यात आले आहे.