ठाणे : राष्ट्रवादीशी युती केल्यामुळे जिल्हा परिषदेची सत्ता मिळाल्याजोगी स्थिती असतानाही भाजपा पुरस्कृत एक अपक्ष सदस्य गळाला लावण्याच्या शिवसेनेच्या दोन उतावळ््या नेत्यांच्या फसलेल्या प्रयत्नामुळे हातातोंडाशी आलेला सत्तेचा पट उधळला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीला वगळून बहुमताचा आकडा गाठण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे त्या पक्षात अस्वस्थता पसरली असून भाजपाने वरिष्ठ नेत्यांच्या मदतीने त्या पक्षालाच गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे शिवसेनेची सारी सत्तासमीकरणे उधळली जाण्याची भीती निर्माण झाली आहे.जिल्हा परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेचे भिवंडीतील नेते आणि ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या पराभवानंतर शिवसेनेतील गटबाजी उफाळून आली आहे. निवडणुकीपूर्वीच शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी असतानाही शिवसेनेच्या दोन नेत्यांनी भाजपापुरस्कृत अपक्ष सदस्याला गळाला लावण्याचा केलेला प्रयत्न फसला. शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीकडे बहुमत असतानाही सदस्याच्या फोडाफोडीची गरज काय, असा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सवाल आहे. शिवसेनेच्या दोन नेत्यांच्या ‘मामा’गिरीमुळे हातातोंडाशी आलेला सत्तेचा पट उधळला जाण्याची भीती आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून भाजपाला मदत गेली जाते, असे राज्य पातळीवर मानले जाते. शिवसेना नेत्यांच्या या धसमुसळेपणाने तशीच मदत त्यांनी करायची ठरवल्यास जिल्हा परिषदेच्या राजकारणात गोंधळ उडू शकतो.जिल्हा परिषदेतील ५३ जागांपैकी एक काँग्रेसने बिनविरोध जिंकली. एका जागेवर फेरमतदान होणार आहे. उरलेल्या जागांपैकी शिवसेनेला २६ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला १० जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेने स्वबळावर बहुमताचा आकडा गाठण्याासाठी भाजपापुरस्कृत अशोक घरत यांना फोडले. जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भगवा झेंडा खांद्यावर देत त्यांना शिवसेनाप्रवेश देण्यात आला. काही तासांतच भाजपाच्या नेत्यांनी पुन्हा घरत यांना आपल्यासोबत ठेवण्यात यश मिळवले. या घडामोडींत शिवसेनेचे भिवंडीतील दोन नेत्यांची महत्त्वाची भूमिका होती, असे सांगतात. राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणुकीत मदत घेतल्यानंतर आता त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी शिवसेना नेते खेळत असल्याचा त्यांच्या नेत्यांचा समज झाला आहे.खासदारकीच्या स्पर्धेतपाटील यांच्याऐवजी मामा?भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्याविरोधात शिवसेनेकडून प्रकाश पाटील प्रमुख दावेदार मानले जातात. पण जिल्हा परिषदेचा गट त्यांना राखता न आल्याने जिल्हा परिषदेवर नव्याने निवडून आलेल्या ‘मामां’कडे सूत्रे गेली आहेत. त्याआधारे प्रकाश पाटील यांना पिछाडीवर टाकून लोकसभेच्या गावाला जाण्याचा ‘मामां’चा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. त्यातूनच भिवंडीतील त्या लोकप्रतिनिधीने प्रकाश पाटील यांच्या जिल्हा परिषद गटात विरोधकांना कुमक पुरविल्याची उघड चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या राजकारणातून प्रकाश पाटील यांना हद्दपार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून त्याचाच भाग म्हणून शिवसेनेला काठावरचे बहुमत मिळवून देण्याचा प्रयत्न झाल्याचे समजते.जिल्हा परिषदेचे अंकगणित -शिवसेना - २६, राष्ट्रवादी - १०, भाजपा - १४, काँग्रेस - एक, अपक्ष - एक (भाजपापुरस्कृत). एका जागेवर फेरमतदानहोणार आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची युती असल्याने त्यांची सदस्यसंख्या ३६ होते. पण शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेव अपक्ष सदस्य सोबत घेण्याचा प्रयत्न करून काठावरच्या बहुमतासाठी लागणारी २७ ही सदस्यसंख्या गाठण्याची घाई केली आणि त्यातून राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरली.भाजपाच्या प्रयत्नानुसार त्यांचे १४, राष्ट्रवादीचे १०, एक अपक्ष असे संख्याबळ २५ होते. काँग्रेसच्या एकमेव सदस्याला सोबत घेतल्यास २६ चे संख्याबळ गाठता येते. शिवाय शेलार गट हाताशी राहतोच.शिवसेना आणि भाजपाच्या गटाचे सध्याचे संख्याबळ समान होत असल्याने नंतर फोडाफोडी किंवा एखाद्या सदस्याला अनुपस्थित रहायला लावून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवण्याच्या भाजपाच्या हालचाली आहेत.कपिल पाटील यांच्या खेळीची भीती -राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना प्रवेश देत गेल्याने राज्यात भाजपाची ताकद वाढली. त्यामुळे ठराविक मर्यादेपलिकडे भाजपाकडून राष्ट्रवादीला अडचणीत आणले जात नाही. कल्याण-डोंबिवली, भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी चांगली कामगिरी करू न शकल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत प्रदेश पातळीवरील नेत्यांना फारशी आशा नव्हती. त्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेशी युती करण्यास अनुकूलता दाखवण्यात आली.आता जर शिवसेनेने धोबीपछाड दिला, तर मात्र राष्ट्रवादी काँंग्रेसकडून भाजपाला सहकार्याची भूमिका घेतली जाऊ शकते, अशी भीती स्थानिक नेत्यांना वाटते. सध्याच्या ५२ सदस्यांमध्ये भाजपचे १४, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे १० आणि एक अपक्ष अशा २५ सदस्यांची वेगळी मोट बांधली जाऊ शकते. कॉंग्रेसच्या एकमेव महिला सदस्य निवडून आल्याने त्यांना पक्षांतरबंदीचा कायदाही लागू होणार नाही.त्या सोबत गेल्यास शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संख्याबळ समान होऊ शकते. शेलार गटात फेरमतदान होणार आहे. त्या गटावर भाजपाचा वरचष्मा असल्याने भाजपाला नाहक संधी मिळण्याची भीती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटते. जिल्हा परिषदेच्या इतिहासात फोडाफोडीच्या राजकारणात भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी नेहमीच यश मिळविले.यापूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील रिंगणात असतानाही पालघरमधील पाच सदस्यांचा गट तटस्थ राहिला होता आणि त्या सदस्यांना ‘मातोश्री’वरु न अभय मिळाले होते. भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला बहुमत असतानाही कपिल पाटील यांनी कॉंग्रेसच्या काही सदस्यांना हाताशी धरून घाम फोडला होता. त्यामुळे शिवसेनेची मदत घेत काँग्रेसने उपमहापौरपदावर पाणी सोडले होते. आताही शिवसेनेतील गटबाजीमुळे कपिल पाटील यांना आयती संधी चालून आल्याचे मानले जाते.
ठाणे : राष्ट्रवादीभोवती गळ, शिवसेनेमुळे अस्वस्थता : उतावळ्या नेत्यांनी बिघडवली समीकरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 1:46 AM