ठाणे : मेफेड्रॉन (एमडी पावडर) हे अमली पदार्थ विक्रीसाठी नेणाºया तिघांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ८२२ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली असून, त्याची किंमत १६ लाख ४४ हजार रुपये आहे. अटकेतील नाशिकच्या गंजमाळ येथील अक्रम खान (३०) याच्याविरोधात तेथील विविध पोलीस ठाण्यांत १८ गुन्हे दाखल असून त्याच्याविरोधात मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे. तो त्या गुन्ह्यात फरार असल्याची माहिती ठाणे शहर अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. या कारवाईत एमडीचे मध्य प्रदेश कनेक्शनही पुढे आले आहे. नाशिक येथील सराईत गुन्हेगार अक्रम खान हा एमडी पावडरविक्रीसाठी ठाण्यातील नितीन चौक येथे येणार असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांच्या (गुन्हे शाखा) वागळे इस्टेट युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचून अक्रमला ताब्यात घेतले. नाशिकमधील मुंबईनाका पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. तसेच त्याच्याकडून जप्त केलेल्या एमडी पावडरचा साठा मध्य प्रदेश, इंदूर येथील रईसउद्दीन सल्लाउद्दीन शेख (४५) आणि अजय जाधवन यांच्याकडून घेतल्याची कबुली दिली. त्यानुसार, त्यांना अटक केली. त्यांच्या चौकशीत हा साठा मध्य प्रदेशच्या बैतुल येथील भोलानामक व्यक्तीकडून घेतल्याची बाब पुढे आली आहे. अक्रम हा साठा नाशिकमध्ये नेत होता. या तिघांना ठाणे न्यायालयात हजर केल्यावर अक्रम याला ८ जानेवारी, तर रईस आणि अजय या दोघांना ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.अक्रम खान, रईसउद्दीन सल्लाउद्दीन शेख आणि अजय जाधवन या तिघांविरोधात अमली पदार्थविरोधीचे गुन्हे दाखल आहेत का, याचे रेकॉर्ड तपासले जात आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार करत आहेत. यापूर्वीही ठाण्यात अमली पदार्थांचे रॅकेट उघड झाले होते.
ठाणे : एमडी पावडरप्रकरणी तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 1:58 AM