- जितेंद्र कालेकर ठाणे - अवघ्या ८४ दिवसांच्या नवजात बाळाची (मुलीची) पाच लाखांमध्ये विक्री करणाऱ्या साहिल उर्फ सद्दाम हुसेन खान (३२, रा. मुंब्रा) या दलाल आणि मुलीच्या आईसह नऊ जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांनी शुक्रवारी दिली. नाशिक येथून आणलेल्या या बाळाचीही आरोपींच्या तावडीतून सुटका केली आहे.
मुंब्रा येथे नवजात बाळाची बेकायदा विक्री होणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळाली होती. त्याचआधारे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पंजाब उगले आणि उपायुक्त पराग मणेरे यांच्या मार्गदर्शनाखाली चौधरी यांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून या टोळीशी संपर्क केला होता. दरम्यान, या टोळीतील दोघा दलालांनी २२ मे रोजी बनावट ग्राहकाशी संपर्क साधून त्यांच्याकडे एक तीन महिन्यांची मुलगी विक्रीसाठी असल्याचे सांगितले. या बाळासाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील, असेही दोघा दलालांनी बनावट ग्राहकाला सांगितले. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे बनावट ग्राहकाने या टोळीस बाळ खरेदी करण्यास संमती दर्शवली. त्यानंतर २३ मे रोजी या टोळीतील सात जण बाळाला घेऊन नाशिकहून मुंब्य्रात आले. यावेळी पोलिसांनी पहाटे सहाच्या सुमारास मुंब्रा रेतीबंदर बस स्टॉप येथे सापळा लावून सहा जणांना अटक करून बाळाची सुखरूप सुटका केली. या टोळीतील अन्य एकास त्याच दिवशी मुंब्य्रातून अटक केली.
या बाळाची आई आणि एका तृतीयपंथीयाला नाशिक येथून अटक केली. साहिल उर्फ सद्दाम याच्यासह साहिदा रफिक शेख (४०, अमृतनगर, मुंब्रा), खतीजा सद्दाम हुसेन खान (२७, मुंब्रा), प्रताप किशोरलाल केशवानी (२३, उल्हासनगर), मोना सुनील खेमाने (३०, टिटवाळा), सुनीता सर्जेराव बैसाने (३५, नाशिक), सर्जेराव बैसाने (नाशिक), शालू कैफ शेख (२५, नाशिक, बाळाची आई) आणि तृतीयपंथी राजू वाघमारे (३०, नाशिक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीच्या ताब्यातून बाळाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली असून, या बाळास विश्व बालक केंद्र, नेरूळ नवी मुंबई येथे ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.