ठाणे : शहरातील वेगवेगळया भागातील तीन महिलांकडील एक लाख ५४ हजारांची चार मंगळसूत्रे हिसकावल्याच्या घटना सोमवारी एकाच दिवशी घडल्या. मंगळसूत्र हिसकावण्याच्या वाढत्या घटनांमुळे महिलांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. याप्रकरणी नौपाड्यात एक तर कापूरबावडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.यात गोखले रोडवर राहणाºया ७२ वर्षीय महिला त्यांच्या पतीसमवेत ९ आॅक्टोंबर रोजी सकाळी ६.१५ वाजण्याच्या दरम्यान हरिनिवास सर्कल येथून खाऊ गल्ली मार्गे कचराळी तलावासमोरील परमार्थ निकेतन कलावती मंदिरात पायी जात होत्या. त्याचवेळी त्यांच्यापाठीमागून आलेल्या दोन अनोळखींनी या महिलेच्या गळयातील ४५ ग्रॅम वजनाचे ९० हजारांचे एक मंगळसूत्र तसेच २० हजारांची एक सोन्याची माळ असा एक लाख दहा हजारांचा ऐवज त्यांच्याकडून हिसकावण्यात आला.याप्रकरणी त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मनोरमानगर येथे राहणारी ३५ वर्षीय महिला सोमवारी सकाळी ७.२० वा. च्या सुमारास आरमॉलच्या बाजूने मनोरमानगरकडे जाणाºया रस्त्यावर रिक्षा गॅरेजसमोरुन घरी जात होती. त्याचवेळी ूएका मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांची २५ हजारांची सोनसाखळी हिसकावून पलायन केले. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.तर अन्य एका घटनेत पुण्यातील ६८ वर्षीय महिला ठाण्यात काही कामानिमित्त आली होती. ती सोमवारी सकाळी ७.१५ वा. च्या सुमारास वाघबिळ येथील प्रेस्टीज रेसिडेंन्सी सोसायटीच्या बाहेरील रस्त्यावरुन मॉर्निंग वॉक करीत असतांना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या अनुक्रमे २२ हजार आणि १७ हजार अशा ३९ हजारांच्या दोन सोनसाखळ्या हिसकावून पलायन केले. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी ठाणे पोलिसांनी मुंब्रा तसेच कल्याणच्या अंबिवली भागातील इराणी वस्तीवर धाडी टाकून अनेक इराण्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बरेच गुन्हे उघडकीस आल्यानंतर त्यांच्यावर मोक्कांतर्गतही कारवाई केली.
ठाण्यात एकाच दिवशी तिघींची मंगळसूत्रे हिसकावली, तीन पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 2:31 AM